एलबीटी चार वर्षांपूर्वीच बंद, कर्मचाऱ्यांना पगार सुरुच; कोल्हापूर महापालिकेचा आंधळा कारभार
By भारत चव्हाण | Published: September 16, 2022 12:10 PM2022-09-16T12:10:03+5:302022-09-16T12:10:35+5:30
महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अनेकांचा हस्तक्षेप असल्यामुळे वर्षानुवर्षे बदलीची प्रक्रिया राबविली जात नाही. अनेक कर्मचारी मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत.
भारत चव्हाण
कोल्हापूर : ‘महानगरपालिकेचे काम आणि सहा महिने थांब’ ही प्रतिमा बदलण्याचा प्रशासक कादंबरी बलकवडे या सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचे अवलोकन केले जात नसल्यामुळे अनेक ठिकाणी अनावश्यक कर्मचारी, तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एलबीटी बंद होऊन चार वर्षे झाली तरीही या विभागातील ३० पेक्षा अधिक कर्मचारी केवळ बसून पगार घेत आहेत.
एलबीटीची जुनी वसुली अद्याप प्रलंबित आहे. व्यापाऱ्यांनी एलबीटीचे स्वयंमूल्यांकन करायचे होते. त्याच्या सुनावण्या घेऊन कर निश्चिती करायची कामे बाकी आहेत. पण ही कामे किती वर्षे सुरू राहणार, हाच प्रश्न आहे. तेथील कर्मचारी जेवढा पगार घेतात तेवढीही वसुली त्यांच्याकडून होत नाही.
महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात अनेकांचा हस्तक्षेप असल्यामुळे वर्षानुवर्षे बदलीची प्रक्रिया राबविली जात नाही. अनेक कर्मचारी मोक्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. नगरसेवक, युनियन पदाधिकारी यांचे वशिले लावले गेल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करणेही जिकिरीचे झाले आहे. वरिष्ठ अधिकारी चतुर्थश्रेणी, लिपिक यांच्या कामकाजात फारसे लक्ष घालत नाहीत. त्यांना तेवढा वेळही मिळत नाही. हीच संधी साधून अनेकांनी वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडले आहे.
विभागांचा आढावा आवश्यक
महानगरपालिकेची कोणतीच यंत्रणा विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेताना दिसत नाही. प्रशासनात कोणत्या विभागात जास्त कर्मचारी आहेत, कोणत्या विभागात कर्मचारी कमी आहेत, याचे अवलोकन केले जात नाही. त्यामुळे काही विभाग कमी कर्मचाऱ्यांवरही काम करत आहेत आणि काही विभागात कर्मचारी जास्त असल्याने निवांत बसून दिवस काढत जात आहेत. काही शिपाई एक विभागातून दुसऱ्या विभागात फाईल घेऊन जातानासुध्दा केवढे कष्ट पडत असल्याचा आव चेहऱ्यावर आणत असतात.
घरफाळा विभागात कर्मचारी कमी
घरफाळा हा सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा विभाग आहे. त्याठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याच्या सतत तक्रारी होत आहेत. परंतु ज्या विभागाकडून आता फारसे काम उरलेले नाही, अशा एलबीटी विभागात मात्र तीसहून अधिक कर्मचारी बसून आहेत. एलबीटी बंद होऊन चार ते पाच वर्षे होऊन गेली. त्यामुळे तेथे आता फारसे काम राहिलेले नाही. तरीही त्या विभागाकडे वरिष्ठांचे लक्ष नाही.