कोल्हापूरकरांना दिलासा; महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या आली शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 04:11 PM2021-11-24T16:11:37+5:302021-11-24T16:12:12+5:30
भारत चव्हाण कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णसंख्येची सर्वोच्च पातळी गाठणाऱ्या कोल्हापूर शहरात मंगळवारी प्रथमच नवीन रुग्णांची संख्या शून्यावर ...
भारत चव्हाण
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णसंख्येची सर्वोच्च पातळी गाठणाऱ्या कोल्हापूर शहरात मंगळवारी प्रथमच नवीन रुग्णांची संख्या शून्यावर आली. कोरोना संसर्गाच्या काळात अनंत अडचणीतून कोल्हापूर शहराने रुग्णसेवेचा मोठा भार सोसला. सीपीआर तसेच महानगरपालिका आयसोलेशन रुग्णालयाने तोकड्या सुविधा सुधारण्याबरोबरच रुग्णांवर उपचार केले. दोन्ही संस्थांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या जिद्दीने कोरोनाविरुध्दची लढाई लढली आणि जिंकली.
कोरोनासारख्या जागतिक महामारीने कोल्हापूर जिल्ह्यावर जोरदार हल्ला केला. डोळ्यांनी न दिसणाऱ्या या विषाणूने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले. आरोग्याच्याबाबतीत मोठी दहशत निर्माण केली. नवीनच असलेल्या या विषाणूविरुध्दची उपचार यंत्रणा अस्तित्वात नसताना त्याविरुध्दची लढाई ही अतिशय कठीण होती. सीपीआर व आयसोलेशन रुग्णालय ही दोन समर्पित रुग्णालये म्हणून जाहीर करून तेथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले.
जिल्ह्यातील पहिला रुग्ण महानगरपालिका हद्दीत भक्तिपूजानगर येथे दि. २७ एप्रिल २०२० रोजी आढळून आला आणि बघता बघता कोरोना विषाणूने संपूर्ण जिल्ह्याला कवेत घेतले. कोरोना काळात रुग्णसेवेचा सर्वाधिक भार कोल्हापूर शहरावर पडला. जिल्ह्यातील रुग्ण, जिल्ह्याबाहेरील रुग्ण, तसेच परराज्यातील रुग्णांवर देखील शहरात उपचार करण्यात आले. खात्रीशीर उपचार करणारी रुग्णालये म्हणून याच काळात सीपीआर आणि आयसोलेशनचा नावलौकिक झाला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग अधिक होता. दि. २९ मे २०२१ रोजी एकाच दिवसात शहरात सर्वाधिक म्हणजे ५६४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते, तर दि. ३१ मे २०२१ रोजी शहरात सर्वाधिक ३०२० रुग्ण उपचाराधिन (ॲक्टिव्ह) होते. मे आणि जून या दोन महिन्यात संसर्गाचा कहर सुरूच राहिल्याने बेडसह योग्य उपचार मिळण्यातही अडचणी येत होत्या. परंतु काळ सरला तसा संसर्ग कमी झाला. मंगळवारचा दिवस तर कोल्हापूरकरांना खूशखबर घेऊन आला. संपूर्ण दिवसभरात एकाही नवीन रुग्णाची तसेच मृताची नोंद झाली नाही. सध्या केवळ १० रुग्ण उपचाराधिन आहेत.
- ५४ हजार रुग्णांची, १२६० मृतांची नोंद
कोल्हापूर शहरात २७ एप्रिल २०२० पासून २३ नोव्हेंबर २०२१ या काळात कोरोनाच्या ५४ हजार १९३ रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी १२६० रुग्ण उपचार घेत असताना मृत झाले. कोरोनामुळे मृत झालेल्या सर्वच रुग्णांवर कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संकटातही सुधारल्या सेवा...
आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही कोरोना काळात महानगरपालिकेने आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला. आयसोलेश रुग्णालयात आवश्यक व्हेंटिलेटसह अतिदक्षता विभाग, ७० बेडचा कक्ष, दहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लॅंट उभारला.