कोल्हापूर महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट वापराविना पडून, तीन वर्षांपासून बंद असल्याने खराब होण्याची शक्यता
By भारत चव्हाण | Updated: December 16, 2024 15:22 IST2024-12-16T15:22:00+5:302024-12-16T15:22:38+5:30
३० लाखांचा बुस्टर पंप बसविला तर मनपासह खासगी रुग्णालयांची होणार सोय

छाया-नसीर अत्तार
भारत चव्हाण
कोल्हापूर : ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी मराठीत एक म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय आणणारी घटना महानगरपालिका प्रशासनाकडून घडली आहे. चार वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात शेकडो नागरिकांचे प्राण वाचविणारा ऑक्सिजन जनरेटर प्लांट सध्या वापराविना पडून आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्लांट बंद स्थितीत असल्याने तो खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सन २०२० च्या एप्रिल महिन्यात कोल्हापूर शहर परिसरात कोरोना महामारीचे रुग्ण सापडायला लागले. रुग्णांची संख्या वाढायला लागली, रुग्णालयात रुग्णांसाठी बेड मिळणे मुश्किल झाले. तेव्हा कोविड सेंटर सुरू करण्यात आली. परंतु, रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासायला लागला. अनेक रुग्ण व्हेंटिलेटर न मिळाल्याने प्राणास मुकले. त्यावेळी प्रशासनही हतबल झाले.
जिल्ह्यात सर्वांत जास्त रुग्ण सीपीआर आणि महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या कोविड सेंटरकडे भरती होत होते. त्यामुळे व्हेंटिलेटसह रुग्णांना लागणारा ऑक्सिजन उभा करणे एक आव्हान होते. तेव्हा सीपीआर प्रशासनाने रुग्णालय आवारात, तर महापालिका प्रशासनाने आयसोलेशन रुग्णालय परिसरात तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारला. या ऑक्सिजनअभावी तडफडणाऱ्या शेकडो रुग्णांना जीवदान दिले.
ऑक्सिजन जनरेटर प्लांटचा उपयुक्त वापर झाल्यानंतर कोरोना संपताच पुढे दोन वर्षांतच आयसोलेशन रुग्णालय आवारात उभारण्यात आलेल्या या प्लांटकडे दुर्लक्ष झाले. आज त्याचा वापर शून्य झाला आहे. वापराविना पडून आहेत. हा प्लांट उभारण्यासाठी ८० लाख २५ हजार रुपये खर्च झाले होते. जिल्हा नियोजन समितीने हा निधी उपलब्ध करून दिला. आता त्याच्या वापराविना हा प्लांट अक्षरश: गंजून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बूस्टर पंपाचा ३० लाखांचा खर्च
हा ऑक्सिजन जनरेटर प्लांट सुरू ठेवून त्यांच्यापासून ऑक्सिजन निर्मिती करून तो शहर परिसरातील खासगी रुग्णालयांना पुरवठा करण्याचा प्रस्ताव महापालिका आरोग्याधिकारी कार्यालयाकडून समोर आणला आहे. त्याकरिता ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु, वापरात नसलेल्या ऑक्सिजन प्लांटवर इतका खर्च करण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मागण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु, तिकडूनही फारसा प्रतिसाद दिला गेला नाही. बूस्टर पंप नसल्याने हा प्लांट बंद पडला आहे.
महापालिकेचा आठ लाखांचा खर्च
महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनवर वर्षाला सात ते आठ लाख रुपये खर्च करावा लागत आहे. त्यामुळे बूस्टर पंप खरेदी करून तो केवळ महापालिकेसाठी जरी वापरला तरी चार वर्षांनंतर हा खर्च करावा लागणार नाही आणि ऑक्सिजन विकला तर त्यापासून पैसे तर मिळतील शिवाय खासगी रुग्णालयातील रुग्णांची सोय होईल.