कोल्हापूर महापालिकेचे टेंडर अन् गुवाहाटीची चर्चा; महापालिकेने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 01:54 PM2024-02-02T13:54:31+5:302024-02-02T13:57:04+5:30
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत बसवण्यात येणारी गॅस दाहिनीची किंमत एक कोटीवर असल्याने महापालिकेने नियमानुसार देशातील विविध राज्यात इंग्रजी दैनिकांत ...
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत बसवण्यात येणारी गॅस दाहिनीची किंमत एक कोटीवर असल्याने महापालिकेने नियमानुसार देशातील विविध राज्यात इंग्रजी दैनिकांत जाहिरात प्रसिद्ध केली आहे; मात्र राज्यातील सत्ताबदलावेळी आमदार गुवाहाटीला गेल्याचा संदर्भ असल्याने कोल्हापूर महापालिकेस निविदा प्रसिद्ध करण्यास गुवाहाटीचा पेपर बरा सापडला. एवढ्या लांबच्या पेपरमध्ये जाहिरात देण्याचं प्रयोजन काय ? काय झाडी काय डोंगार काय हाटील...सगळंच एकदम भारी असा मिश्किल मेसेज समाजमाध्यमातून फिरत आहे. याची दखल घेऊन महापालिकेने हा मेसेज चुकीचा असून नियमानुसार देश पातळीवर जाहिरात प्रसिद्ध केल्याचा खुलासा केला आहे.
शासनाच्या स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पंचगंगा स्मशानभूमीत १ कोटी ५८ लाख ७२३ रूपयांची गॅस दाहिनी बसवणार आहे. याची किंमत एक कोटीवर असल्याने महापालिकेने राष्ट्रीय पातळीवर टेंडरची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरात गुवाहाटीसह दिल्ली, कोलकात्ता, हैदराबाद, चेन्नई, गुजरात, महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली आहे. मात्र सोशल मीडियात गुवाहाटीतील जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा संदर्भ देऊन काय झाडी काय डोंगार काय हाटील.. असे म्हणत खिल्ली उडवली आहे. समाज माध्यमात व्हायरल झाल्याने याचा महापालिकेस खुलासा करावा लागला.