कोल्हापूर पालिकेने ‘अॅस्ट्रोटर्फ’चा प्रस्ताव दिल्यास केंद्राकडे पाठवू
By admin | Published: July 22, 2016 12:37 AM2016-07-22T00:37:25+5:302016-07-22T00:53:13+5:30
नरेंद्र सोपल : पुणे येथे झालेल्या चर्चेत आश्वासन
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने ‘खेलो इंडिया’ या योजनेतून अॅस्ट्रोटर्फसाठी प्रस्ताव पाठविल्यास तो तत्काळ मंजूर करून केंद्राकडे पाठविण्यात येईल. त्यासाठी विशेष प्रयत्नही करू, असे आश्वासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे या कार्यालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी दिले. सोपल यांची ‘स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडिया’च्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा हॉकी संघटनेच्यावतीने बालेवाडी (पुणे) येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या चर्चेत ते बोलत होते.
सोपल म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला हॉकी खेळाची परंपरा आहे. शालेय व महाविद्यालयीन स्तरांवर खेळणाऱ्या मुला-मुलींच्या संघाने राज्य व राष्ट्रीय पातळ्यांवर गेली अनेक वर्षे देदीप्यमान कामगिरी केली आहे, याची मला कल्पना आहे. त्यामुळे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय हॉकीपटू तयार होण्यासाठी टर्फ आवश्यक आहे. त्याचा फायदा कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील खेळाडूंनाही होईल. कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी केंद्र शासनाने नव्याने सर्व खेळांसाठी मंजूर केलेल्या ‘खेलो इंडिया’ या योजनेतून ५.५० कोटी मंजूर होऊ शकतात; पण यात दरवर्षी दोनच खेळांचे प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्याची तरतूद आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिका व जिल्हा हॉकी संघटनेच्या वतीने टर्फ बसविण्याचा प्रस्ताव तत्काळ पाठविल्यास त्याला आपल्या कार्यालयाची त्वरित मंजुरी देऊन हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवू, असे आश्वासन सोपल यांनी दिले.
यावेळी जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष विजय साळोखे-सरदार, सचिव सुदाम तोरस्कर, मोहन भांडवले, ताहिर शेख, आदी उपस्थित होते.