कोल्हापूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणूकीकरीता दोघांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 06:41 PM2017-09-21T18:41:57+5:302017-09-21T18:43:50+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथील पोटनिवडणूकीकरीता गुरुवारी दोघांनी आपले उमेदवारी अर्ज भरले.
राज बाबुभाई जाधव (शिवसेना) व रत्नेश जिन्नाप्पा शिरोळकर (ताराराणी आघाडी) अशी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांची नावे आहेत. कॉँग्रेस - राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार राजेश भरत लाटकर शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
माजी नगरसेवक निलेश देसाई यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथे पोटनिवडणुकीची प्रक्रीया सुरु झाली आहे.
प्रभाग क्रमांक ७७, शासकीय मध्यवर्ती कारागृह येथून निवडणूक आलेल्या अश्विनी अमर रामाणे यांचाही कुणबी जातीचा दाखल अवैध ठरल्याने या प्रभागातही निवडणूक प्रक्रीया सुरु झाली होती, परंतू उच्च न्यायालयाने रामाणे यांच्यावरील कारवाईला स्थगिती दिल्यामुळे तेथील प्रक्रीया स्थगित करण्यात आली आहे.
ताराबाई पार्क प्रभागातील पोटनिवडणूकीची प्रक्रीया १६ सप्टेंबरपासून सुरु झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस शनिवार (दि.२३) हा आहे. घटस्थापनेचा मुहुर्त साधून गुरुवारी शिवसेनेतर्फे राज बाबुभाई जाधव (भोरी) यांनी तर ताराराणी आघाडीतर्फे रत्नेश जिन्नाप्पा शिरोळकर यांनी उमेदवारी अर्ज भरले.
राज जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरताना आमदार राजेश क्षीरसागर, परिवहन सभापती नियाज खान, शिव माथाडी कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश सरनाईक, उपशहर प्रमुख जयवंत हारुगले, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, राजू काझी, दिपक चव्हाण , महिला आघाडीच्या मंगल साळोखे, मंगल कुलकर्णी, युवासेनेचे शहर प्रमुख चेतन शिंदे, पियुष चव्हाण अविनाश कामते, अनिकेत राऊत, जयदिप रसाळ व शिवसैनिक उपस्थित होते. तत्पूर्वी जाधव यांनी प्रभागातून सासने गल्ली, बेकर गल्ली येथून पदयात्रा काढली.
भाजप - ताराराणी आघाडीतर्फे रत्नेश जिन्नाप शिरोळकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, गटनेते विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, नगरसेवक राजसिंह शेळके, माजी नगरसेवक निलेश देसाई यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते.