कोल्हापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी सादर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 07:09 PM2018-03-30T19:09:27+5:302018-03-30T19:09:27+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्पशनिवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभापती आशिष ढवळे सादर करतील. कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असली तरी स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत झालेल्या गद्दारीमुळे भाजपच्या ढवळे यांना सभापती होण्याचा मान मिळाला. सध्या राज्यात, देशात भाजपची सरकारे असल्यामुळे ढवळे अर्थसंकल्पातून कोल्हापूरकरांना काय देणार, याबाबत मात्र महापालिका वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.
कोल्हापूर : महानगरपालिकेचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्पशनिवारी महानगरपालिकेच्या विशेष सभेत सभापती आशिष ढवळे सादर करतील. कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता असली तरी स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत झालेल्या गद्दारीमुळे भाजपच्या ढवळे यांना सभापती होण्याचा मान मिळाला. सध्या राज्यात, देशात भाजपची सरकारे असल्यामुळे ढवळे अर्थसंकल्पातून कोल्हापूरकरांना काय देणार, याबाबत मात्र महापालिका वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी ७ मार्चला सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित तसेच सन २०१८-१९ या वर्षाचे नवीन अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी त्यावर अभ्यास करून काही फेरफार केले आहेत. सभापती आशिष ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांच्यासमवेत त्याकरिता सतत बैठका सुरू होत्या. शुक्रवारी सायंकाळी अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरविला गेला.
वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेले आशिष ढवळे हे महापालिका सभागृहात स्वत: पॉवरपॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याची पूर्वतयारी शुक्रवारी घेण्यात आली.
यापूर्वी मुरलीधर जाधव यांनी अशाप्रकारे अर्थसंकल्प सादर केला होता; परंतु ढवळे स्वत: त्याचे वाचन आणि स्पष्टीकरण देणार आहेत. विशेष म्हणजे ढवळे भाजपचे नगरसेवक असल्यामुळे त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून निधीकरिता आश्वासन घेऊन काही नवीन व नावीन्यपूर्ण योजना तसेच गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या योजनांच्या पूर्ततेचा प्रयत्न यावर्षीच्या अर्थसंकल्पाद्वारे करतील अशी अपेक्षा आहे.
राज्य नगरोत्थान योजनेतील दुसरा टप्पा, ‘सेफ सिटी’चा दुसरा टप्पा, केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील खाऊ गल्लीचा विकास, शहरातील सार्वजनिक बागांचा विकास, केंद्र सरकारकडून के.एम.टी.करिता विजेवर चालणा बसेस घेणे, शहरातील महत्त्वाचे चौक सुशोभिकरण करणे, पाच उड्डाणपूल उभारण्याची योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशी काही महत्त्वाची कामे प्रलंबित आहेत. या कामांना अर्थसंकल्पात कितपत न्याय मिळतो हा एक उत्सुकतेचा विषय आहे.
महापालिकेत भाजपचा सभापती प्रथमच झाल्यामुळे माझ्याकडून शहरवासीयांच्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि प्रशासनाकडून त्या पूर्ण करून घेण्याच्या आपला नक्कीच प्रयत्न राहील. पुढील वर्षात चांगले काम करून दाखविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
- आशिष ढवळे,
स्थायी सभापती सभापती