नवीन रस्त्यावर दोन वर्षे खुदाईला बंदी, कोल्हापूर महापालिकेचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 01:35 PM2023-10-20T13:35:17+5:302023-10-20T13:35:49+5:30

सर्व विभागांत राखणार समन्वय

Kolhapur Municipal Corporation's decision to ban digging on new roads for two years | नवीन रस्त्यावर दोन वर्षे खुदाईला बंदी, कोल्हापूर महापालिकेचा निर्णय 

नवीन रस्त्यावर दोन वर्षे खुदाईला बंदी, कोल्हापूर महापालिकेचा निर्णय 

कोल्हापूर : एखादा रस्ता केला की पुढे काही महिन्यांतच काही कामांसाठी त्यावर खुदाई केली जाते. त्यामुळे रस्ते करूनही खराब होण्याचे प्रकार जास्त घडत आहेत. त्यामुळे येथून पुढे एखादा रस्ता नव्याने केला की त्यावर पुढील दोन वर्षे खुदाईला बंदी केली जाणार आहे. याबाबत महापालिका विभागीय कार्यालये आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वय ठेवला जाईल, असे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले.

कोल्हापुरात रस्ते केल्यानंतर ड्रेनेज दुरुस्ती, ड्रेनेज लाइन टाकणे, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकणे, चेंबर करणे आदी कारणांसाठी खुदाई केली जाते. त्यामुळे नवीन रस्तेही खराब होतात. गेल्या अनेक वर्षांपासून हा अनुभव येत आहे. यात विविध विभागांचा समन्वय असत नाही. तसेच एखाद्या कामांसाठी खुदाई केल्यानंतर त्यावर तातडीने पॅचवर्क केले जात नाही. त्यामुळे यापुढे नियमावली तयार करून वारंवार होणाऱ्या खुदाईला मनाई केली जाणार आहे.

शहर अभियंता घाटगे यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यापासून मंजूर असलेली २१६ कामे शहरात सुरू होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांची कामे आहेत. २१५ कोटी रुपये या कामांवर खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे रस्त्यांची कामे करण्यापूर्वी सर्व विभागीय कार्यालये, पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग यांना त्यांची कामे आधी करून घेण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. एखाद्या रस्त्याचे काम झाले की पुढे किमान दोन वर्षे तरी त्यावर कोणत्याही प्रकारची खुदाई करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

नागरिकांना त्यांच्या भागातील रस्ते करण्यापूर्वी त्याची माहिती देण्यात येणार असून, त्यांनी त्यांची कामे रस्ता होण्याआधी पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन घाटगे यांनी केले आहे.

Web Title: Kolhapur Municipal Corporation's decision to ban digging on new roads for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.