कोल्हापूर महापालिकेची सभा कोरमअभावी तहकुब, गणेशोत्सवासाठी नगरसेवकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 04:02 PM2018-09-12T16:02:44+5:302018-09-12T16:09:03+5:30
गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना प्रभागातील गणेशोत्सव मंडळांच्या तयारीत असलेल्या बहुतांशी नगरसेवकांनी बुधवारी महानगरपालिकेकडे पाठ फिरविल्यामुळे सर्वसाधारण सभा तहकुब ठेवण्याची नामुष्की ओढवली.
कोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना प्रभागातील गणेशोत्सव मंडळांच्या तयारीत असलेल्या बहुतांशी नगरसेवकांनी बुधवारी महानगरपालिकेकडे पाठ फिरविल्यामुळे सर्वसाधारण सभा तहकुब ठेवण्याची नामुष्की ओढवली.
महापौर शोभा बोंद्रे कार्यालयात असूनदेखील त्या कोरम नसल्याने सभागृहात गेल्या नाहीत. त्यामुळे नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी सभेची वेळ संपल्यामुळे कोरम अभावी ती तहकुब करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
गुरुवारपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. त्यामुळे पुढील दहा बारा दिवस सर्वच नगरसेवक त्यामध्ये व्यस्त राहणार असल्याने महापौर शोभा बोंद्रे यांनी बुधवारी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. परंतु तरीही नगरसेवक महापालिकेकडे फिरकले नाहीत.
भाजप - ताराराणीचे सदस्य सभागृहात पोहचले. पण कोरम होत नाही म्हटल्यावर त्यांनीही सभागृह सोडले. सभेची वेळ टळून गेल्यानंतर महापौर बोंद्रे यांच्या सुचनेनुसार नगरसचिव कारंडे यांनी सभा तहकुब करीत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी केवळ चार पाच नगरसेवकच सभागृहात उपस्थित होते.