कोल्हापूर महापालिकेच्या चार बालवाड्यांचा सुधारणार दर्जा
By admin | Published: July 4, 2017 06:59 PM2017-07-04T18:59:08+5:302017-07-04T18:59:08+5:30
माईसाहेब बावडेकर शाळेने घेतल्या दत्तक; गुणवत्तावाढीला बळ
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0४ : येथील माईसाहेब बावडेकर शाळेतर्फे महानगरपालिकेच्या चार बालवाड्या या वर्षी दत्तक घेतल्या आहेत. त्यांतील काही बालवाड्या शाळा स्वत:, तर काही रोटरी क्लबच्या सहकार्यातून चालविणार आहे. त्यामुळे या बालवाड्यांमधील दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.
या वर्षी दत्तक घेतल्या जाणाऱ्या बालवाड्यांमध्ये प्रिन्स शिवाजी विद्यालय, भाऊसाहेब महागांवकर शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा यांचा समावेश आहे. या बालवाड्यांना शैक्षणिक साहित्य पुरविणे, रंगरंगोटी, शिक्षकांचे पगार, त्यांचे प्रशिक्षण, गुणवत्तावाढ व त्यावर देखरेख ठेवणे, आदी जबाबदारी माईसाहेब बावडेकर शाळेची असणार आहे. या शाळेने यापूर्वी दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये पटसंख्या, गुणवत्तावाढ असे अनेक बदल दिसून आले आहेत. यासाठी श्री पंत अमात्य बालविकास विश्वस्त निधीच्या अध्यक्षा नीतूदेवी बावडेकर, नीलराजे बावडेकर विशेष प्रयत्न करीत आहेत.
विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा हा उद्देश
माईसाहेब बावडेकर शाळेच्या माध्यमातून गेल्या वर्षी आम्ही चार बालवाड्या दत्तक घेतल्या होत्या. या बालवाड्यांची रंगरंगोटी, तेथील शिक्षकांना प्रशिक्षण, आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे तेथील पटसंख्या आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे, असे श्री पंत अमात्य बालविकास विश्वस्त निधीचे उपाध्यक्ष नीलराजे बावडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, गेल्या वर्षी कदमवाडी येथील दत्तक घेतलेल्या बालवाडीची पटसंख्या ही पूर्वी ३० पर्यंत होती. यावर्षी ती १२५ पर्यंत पोहोचली आहे. प्राथमिक शिक्षणातील पहिला टप्पा असणाऱ्या बालवाडीमध्ये विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा, या उद्देशाने आम्ही बालवाड्या दत्तक घेतो. या वर्षी चार बालवाड्या दत्तक घेतल्या आहेत. यासाठी रोटरी सनराईज, रोटरी क्लब आॅफ गार्गीज् यांचे सहकार्य घेतले जाते.