कोल्हापूर महापालिका अधिकाऱ्यांना आता बायोमेट्रीक हजेरीची सक्ती
By भारत चव्हाण | Published: December 22, 2023 03:45 PM2023-12-22T15:45:44+5:302023-12-22T15:46:02+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. याआधी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते अधीक्षक पदापर्यंच्या अधिकाऱ्यांनाच अशी ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. याआधी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते अधीक्षक पदापर्यंच्या अधिकाऱ्यांनाच अशी सक्ती होती. विभाग प्रमुख असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. आता मात्र शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या सर्व अधिकाऱ्यांसह विभाग प्रमुखांना बायोमेट्रीक हजेरी देऊनच कामाची सुरवात करावी लागणार असून कार्यालयातून बाहेर पडतानाही हजेरी द्यावी लागेल.
कोल्हापूर महानगरपालिका कार्यालये म्हणजे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी ‘कधीही यावे, कधीही जावावे’ अशी होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती कमी असायची. नागरिकांना अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे विभाग प्रमुख व वरिष्ठ अधिकारी वगळून पालिकेच्या सर्वच कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते अधीक्षकपदापर्यंच्या अधिकाऱ्यांना बायोमॅट्रीक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे.
त्यासाठी महापालिकेत अतिरीक्त आयुक्त कार्यालयात बायोमेट्रीक मशिन बसविले असून त्यावर सर्व अधिकाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. विभागीय कार्यालयातूनही अशी मशिन बसविण्यात आली असून त्या त्या कार्यालयातील अधिकाऱ्यानी आल्याबरोबर हजेरी नोंदवायची आहे.