पूरक्षेत्रातील चार रुग्णालयांना कोल्हापूर पालिकेची नोटीस, ७८ नागरिकांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 05:55 PM2024-07-23T17:55:06+5:302024-07-23T17:55:59+5:30
संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना इतरत्र हलविण्याची सूचना
कोल्हापूर : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून, यापुढे ती आणखी वाढण्याची शक्यता असल्याने महानगरपालिका प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पूरक्षेत्रात असलेल्या चार रुग्णालयांना सोमवारी रात्री उशिरा पालिकेच्या उपायुक्तांनी नोटीस पाठवून त्यांना नवीन रुग्णांची भरती करून घेऊ नये, तसेच सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना अन्यत्र हलविण्यात यावे, असे कळविले आहे.
नोटीस पोहोचल्यानंतर योग्य ती कार्यवाही केली नाही तर मात्र संबंधित रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्याचा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
सन २०१९ व २०२१ च्या महापुरावेळी पूर क्षेत्रात असलेल्या रुग्णालय प्रशासनाची, तसेच महापालिका प्रशासनाची खूप तारांबळ उडाली होती. महापुराचे पाणी जसे रुग्णालयात शिरायला लागले तसे रुग्णालयातील, तसेच अतिदक्षता विभागातील रुग्ण इतरत्र हलविताना नाकी दम आला होता. त्यावेळी रुग्णांचेही चांगलेच हाल झाले. महापूर येणार आहे हे समजल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नव्हती.
असा प्रसंग यापुढील काळात घडू नये म्हणून पालिका प्रशासनाने खबरदारी घेत सोमवारी ही नोटीस बजावली. अंतरंग, विन्स, डायमंड आणि ॲपल सरस्वती या चार रुग्णालयांचा नोटीस दिलेल्यांमध्ये समावेश आहे. पंचगंगा नदीने ३९ फूट ही इशारा पातळी गाठली आहे. त्यामुळे आपल्या रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना इतरत्र उपचारासाठी दाखल करावे, पूरपातळी कमी होईपर्यंत रुग्णालयात सुरू राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
जर नोटीस दिल्याप्रमाणे कार्यवाही केली नाही तर सर्वस्वी जबाबदार धरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्तांनी म्हटले आहे. चारही रुग्णालयांना या नोटीस सोमवारी रात्री उशिरा देण्यात आल्या.
शहरातील ७८ नागरिकांचे स्थलांतर
पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीवर गेली असल्याने शहरातील नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० नागरिकांना रविवारी व सोमवारी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.
चहा, नाश्ता, जेवणाची सोय
शहरातील पुराचे पाणी आलेल्या तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टीजवळील ५८ व सुतारवाडा येथील २० नागरिकांचे सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर करण्यात आले. वीटपट्टी येथील नागरिकांचे मार्केटयार्ड येथील एका हॉलमध्ये, तर सुतारवाडा येथील नागरिकांचे दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्वांना दोनवेळचे जेवण, दोनवेळचा चहा व एक वेळचा नाश्ता देण्याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.