कोल्हापूर महापालिका :महास्वच्छता मोहिमेस नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 02:33 PM2019-06-17T14:33:30+5:302019-06-17T14:35:47+5:30
कोल्हापूर शहरामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून मोहिमेच्या महास्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ८ डंपर कचरा जमा करण्यात आला. महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले.
कोल्हापूर : शहरामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून मोहिमेच्या महास्वच्छता मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ८ डंपर कचरा जमा करण्यात आला. महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले.
लक्ष्मीपुरीतील विल्सन ब्रिजनजीक अश्विनी हॉस्पिटलच्या पिछाडीस असलेल्या जयंती ओढ्यामध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. संप आणि पंप हाऊस येथे जयंती नाल्यातून वाहून आलेला थर्माकॉल व प्लास्टिक कचरा वाहून काढला.
नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी भागातील नागरिकांसह ताराबाई पार्क येथे विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. विभागीय कार्यालय क्र. ४ च्यावतीने पाटोळेवाडी, काटेमळा, मेनन बंगला परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. रंकाळा तलाव जुना वाशी नाका परिसरातील शाहू उद्यानात वृक्षारोपण केले. कोल्हापूर केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने सर्वांना हँडग्लोज पुरविले.
यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, तौफिक मुल्लाणी, नगरसेविका कविता माने, उपआयुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहा.आयुक्त संजय सरनाईक, दिलीप देसाई, दिलीप पोवार, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, क्रिडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, विक्रांत जाधव, पदाधिकारी, कोल्हापूर केमिस्ट अॅड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे, स्वरा फौंडेशनचे कार्यकर्ते, महापालिकेचे कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
आयुक्त संतापले; स्क्रॅप १५ दिवसांत हटविण्याच्या सूचना
लक्ष्मीपुरी व्हीनस कॉर्नर चौकातील गाडी अड्डा येथे नियोजित संकुल व वाहनतळ असल्याने येथे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी भेट दिली. परिसरात स्क्रॅपच्या गाड्या व स्क्रॅपचे मटेरियल पुन्हा अस्ताव्यस्त पडल्याने निदर्शनास आले, त्यावेळी संतप्त आयुक्तांनी व्यापाऱ्यांना पंधरा दिवसांत या जागेतील कचरा व गाड्या हटविण्याबाबत सूचना दिल्या. महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेतच व्यापाऱ्यांनी व्यवसाय करावा अन्यथा कारवाई करावी लागेल, असा दमच दिला.
पार्किंग झोन जाहीर
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले यांना दि. १ जुलै २०१९ पूर्वी गाडी अड्ड्याची जागा रिकामी करून तेथे वाहन पार्किंग सुरू करण्याचे आदेश दिले. लक्ष्मीपुरीतील अश्विनी हॉस्पिटल शेजारील महापालिकेच्या खुल्या जागेत पार्किंग झोन जाहीर करून तेथे वाहने पार्किंग सुरू करण्याचे आदेश उपशहर रचनाकार नारायण भोसले, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले यांना दिले.
या परिसरात राबविली मोहीम
विल्सन ब्रिज (लक्ष्मीपुरी), हनुमान नगर, अॅस्टर आधार हॉस्पिटल ते जवाहरनगर, कळंबा सांडवा, अहिल्याबाई होळकर डिन्स्पेन्सरी, गवत मंडई, हॉकी स्टेडियम, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागील बाजूस ते लक्ष्मीपुरी परिसरातील स्वच्छता, सिद्धिविनायक गणपती मंदिर पुलाची खालची बाजू, लक्ष्मीपुरी ते आयर्विन ब्रिज, टायटन शोरूमलगत दफनभूमी, आयर्विन ब्रिज ते पंप हाऊस, सुतारवाडा आतील पाईप ठिकाणी, पंप हाऊस ते सिद्धार्थनगर या जयंती नाला परिसर व रंकाळा तलाव पूर्व व पश्चिम बाजूची स्वच्छता केली.