पुण्यातील गुंडाचा कोल्हापुरात खून
By admin | Published: May 17, 2015 01:13 AM2015-05-17T01:13:57+5:302015-05-17T01:13:57+5:30
गिरगावात सापडला मृतदेह : शिर, हातांचे पंजे नसलेले धड; मृत लहू ढेकणे जन्मठेप भोगणारा कैदी
कोल्हापूर / कळंबा : पुणे-सातारा जिल्ह्यात खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण करून दोन खून प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा झालेला, तसेच कळंबा मध्यवर्ती कारागृहातून सहा महिन्यांपूर्वी पॅरोलवर बाहेर पडलेला अट्टल गुंड लहू रामचंद्र ढेकणे (वय ३९, रा. देगाव, ता. भोर, जि. पुणे) याचा कोल्हापुरातील गिरगाव परिसरातील गवती डोंगरावर निर्घृण खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले.
मारेकऱ्यांनी त्याचे शिर व हातांचे पंजे धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हा खून अनैतिक संबंधातून की अन्य कोणत्या कारणातून झाला, याबाबत पोलीस कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, मृतदेहाच्या पॅँटच्या खिशातील डायरी व मतदान ओळखपत्रामुळे ढेकणे याची ओळख पटली; परंतु मृतदेह त्याचाच आहे का, याची खात्री करण्यासाठी त्याचा भाऊ अंकुश ढेकणे याला पोलिसांनी कोल्हापुरात बोलावून घेतले. त्याने मृतदेह ओळखल्यानंतर पोलिसांनी रात्रीच मारेकऱ्यांच्या शोधासाठी पुणे, सातारा, जयसिंगपूर, इचलकरंजी, कऱ्हाड, आदी परिसरात पथके रवाना केली.
गिरगाव परिसरातील गवती डोंगरावर शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गुराख्यांना अज्ञात तरुणाचा शिर व दोन्ही हातांचे पंजे नसलेला मृतदेह दिसून आला. या प्रकाराची माहिती त्यांनी पाचगावचे पोलीस पाटील तात्यासो पाटील यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता तरुणाचा निर्घृण खून केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची वर्दी त्यांनी करवीरचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना दिली. अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, पोलीस निरीक्षक ढोमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या अंगामध्ये निळसर शर्ट व करड्या रंगाची पॅँट होती. पॅँटमध्ये डायरी मिळून आली. त्याशेजारीच चष्मा पडला होता. पोलिसांनी डायरी पाहिली असता त्यामध्ये लहू ढेकणे असे लिहिलेले दिसले. तसेच भाऊ व वहिनी असे लिहून त्यापुढे मोबाईल नंबर लिहिला होता. पोलिसांनी या दोन्ही मोबाईलवर संपर्क साधला असता ढेकणे याच्या वहिनीशी संपर्क झाला. यावेळी त्यांना घटनेची माहिती देऊन त्याच्या भावाला कोल्हापुरात येण्यास सांगितले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह ‘सीपीआर’च्या शवागारात ठेवण्यात आला. पोलिसांनी मृतदेहाचे शिर व हाताचे पंजे शोधून काढण्यासाठी दोन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. श्वानपथकाद्वारे मारेकऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातच घुटमळले. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)