कोल्हापूर : ऊसदराचे तुकडे करणारे मुश्रीफ शेतकऱ्यांचे वैरी : संजय पवार यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 07:16 PM2018-02-07T19:16:28+5:302018-02-07T19:22:14+5:30
शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून हल्लाबोल आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे कैवारी नसून ते वैरी आहेत. शेतकऱ्यांचे मंदिर असलेल्या जिल्हा बॅँकेत बसून ऊसदराचे तुकडे पाडून त्यांचेच गळे कापण्याचा उद्योग त्यांनी केल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली.
कोल्हापूर : शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून हल्लाबोल आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे कैवारी नसून ते वैरी आहेत. शेतकऱ्यांचे मंदिर असलेल्या जिल्हा बॅँकेत बसून ऊसदराचे तुकडे पाडून त्यांचेच गळे कापण्याचा उद्योग त्यांनी केल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली.
जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन ऊसदराचे तुकडे केल्याच्या निषेधार्थ बुधवारी शिवसेनेच्या वतीने जिल्हा बॅँकेच्या दारात निदर्शने केली. यावेळी ‘एफआरपी’ कायद्याच्या पत्रकाची होळी करीत कारखानदारांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.
संजय पवार म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एफआरपी अधिक शंभर रुपये उचल देण्यास कारखानदारांनी सहमती दिली; पण साखरेचे दर घसरले म्हणून जिल्हा बॅँकेत बसून कारखानदारांनी परस्पर पाचशे रुपये उचल कमी केली. साखरेचे दर चाळीस रुपयांच्या वर होते, त्यावेळी शेतकऱ्यांना जादा दर देता का? कायद्याने चौदा दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना तिचे तुकडे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे.
ऊस तुटून अडीच महिने झाले तरी अद्याप शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. शेतकरी विकास संस्थांचे व्याज भरत बसला असताना हक्काच्या ऊसदरालाही कात्री लावण्याचा उद्योग हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
शेतकरी टिकला तर तुमची कारखानदारी टिकेल, याचे भान ठेवा. जिल्हा बॅँक शेतकऱ्यांचे मंदिर आहे. त्या ठिकाणी बसून शेतकऱ्यांचे गळे कापण्याचे काम कराल, तर याद राखा; गाठ शिवसेनेशी आहे. एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना ऊसदर मिळाला पाहिजे, या मागणीचे निवेदन बॅँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजीराव पाटील, विराज पाटील, संभाजी भोकरे, अवधूत साळोखे, कृष्णात पोवार, राजू यादव, शशिकांत बीडकर, रणजित आयरेकर, धनाजी यादव, राजू सांगावकर, आदी उपस्थित होते.
प्रकाश आवाडेंचा सत्कार करू !
हसन मुश्रीफ यांचा आदेश फेटाळून लावत ‘जवाहर’चे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी ठरल्याप्रमाणेच उचल देण्याची घोषणा केल्याबद्दल संजय पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सहमती दर्शविली तर कारखान्यावर जाऊन त्यांचा सत्कार करू, असेही त्यांनी सांगितले.
....तर शेतकऱ्यांचे नो मतदान!
एरव्ही प्रत्येक गोष्टीवर कॉमेंट्स करणारे हसन मुश्रीफ ऊसदराच्या तुकड्यावर ‘नो कॉमेंट्स’ म्हणतात. शेतकऱ्यांशी अशी गद्दारी कराल तर तेही तुम्हाला ‘नो मतदान’ म्हणतील, असा इशारा पवार यांनी दिला.