Kolhapur Crime: आठवड्यात दुप्पट रकमेच्या आमिषाने चौदा कोटींचा गंडा, १० बँक खाती गोठवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 01:46 PM2023-03-03T13:46:05+5:302023-03-03T13:46:34+5:30

नदाफवर चार पोलिस ठाण्यांत गुन्हे

Kolhapur Nadaf-Makandar gang cheated Rs 14 crore 35 lakh with the bait of doubling the amount in a week | Kolhapur Crime: आठवड्यात दुप्पट रकमेच्या आमिषाने चौदा कोटींचा गंडा, १० बँक खाती गोठवली

संग्रहीत छाया

googlenewsNext

कोल्हापूर : गुंतवलेली रक्कम आठवड्यात दुप्पट करून देऊ तसेच ४५ दिवसांत कमी व्याज दराचे कर्ज मिळवून देऊ, असे आमिष दाखवून नदाफ-मकानदार टोळीने जिल्ह्यात १४ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, या टोळीने लोकांकडून ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम उकळल्याचा अंदाज आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी वर्तविला.

रेश्मा बाबासो नदाफ (वय ४१, रा. चंदूर रोड, इचलकरंजी) आणि शब्बीर बाबालाल मकानदार (वय ६२, रा. नदीवेश नाका, इचलकरंजी) यांच्यासह अन्य नऊ संशयितांनी दिल्लीतील युनिक फायनान्स कंपनीचे एजंट असल्याचे सांगत लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. डिसेंबर २०२१ पासून ते ऑगस्ट २०२२ या नऊ महिन्यांत नदाफ-मकानदार टोळीने लोकांकडून ३० कोटींपेक्षा जास्त रक्कम उकळली.

सुरुवातीला ४५ दिवसांत कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतले. प्रोसेसिंग फीच्या नावाखाली कर्जाच्या एकूण रकमेपैकी पाच टक्के रक्कम आधीच घेतली. त्यानंतर लोकांना सात दिवसांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला छोट्या रकमा दुप्पट देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोठ्या रकमा घेऊन पोबारा केला. नदाफ आणि मकानदार यांच्या अटकेनंतर अधिक चौकशीत फसवणुकीच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. लवकरच संशयितांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार असल्याचेही पिंगळे यांनी सांगितले.

१० बँक खाती गोठवली

रेश्मा नदाफ - ३, आर्षद नदाफ - ४, जयवंत चव्हाण - २, सुरेखा चव्हाण - १ या संशयितांची १० बँक खाती पोलिसांनी गोठवली आहेत.

नदाफवर चार पोलिस ठाण्यांत गुन्हे

संशयित रेश्मा नदाफ हिच्यावर २०१६मध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात, तर २०१९मध्ये सोलापूर शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात कर्ज देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. २०२२मध्ये मुरगूड आणि राधानगरी पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नदाफ-मकानदार टोळीने जिल्ह्यात शेकडो लोकांना गंडा घातला असून, त्यापैकी अनेकजण अजूनही तक्रार देण्यासाठी आलेले नाहीत. फसवणूक झालेल्या लोकांनी निर्भयपणे तक्रारी द्याव्यात. - श्रीकांत पिंगळे, पोलिस उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर

Web Title: Kolhapur Nadaf-Makandar gang cheated Rs 14 crore 35 lakh with the bait of doubling the amount in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.