अहमदाबादमार्गे ‘कोल्हापूर-नागपूर’ विमानसेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:18+5:302021-08-18T04:29:18+5:30
कोल्हापूर : अहमदाबादमार्गे कोल्हापूर-नागपूर विमानसेवा आज, मंगळवारपासून सुरू झाली. नव्या बदलानुसार सुरू झालेल्या या सेवेच्या पहिल्या दिवशी एकूण १०५ ...
कोल्हापूर : अहमदाबादमार्गे कोल्हापूर-नागपूर विमानसेवा आज, मंगळवारपासून सुरू झाली. नव्या बदलानुसार सुरू झालेल्या या सेवेच्या पहिल्या दिवशी एकूण १०५ जणांनी प्रवास केला. त्यामध्ये कोल्हापूरहून नागपूरला जाणाऱ्या आठ जणांचा समावेश होता.
इंडिगो कंपनीने दि. २२ फेब्रुवारीपासून कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा सुरू केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने या कंपनीने संबंधित सेवा स्थगित केली. प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दि. १७ जुलैपासून सेवा पूर्ववत सुरू झाली कोल्हापूरमधून नागपूरला जाता यावे, या उद्देशाने कंपनीने अहमदाबादमार्गे नागपूरला जाण्याची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शनिवार असे तीन दिवस ही सेवा पुरविण्यात येणार आहे. नव्या बदलानुसारच्या विमानसेवेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. अहमदाबाद येथून सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये विमान आले. येथून साडेदहा वाजता ते अहमदाबादला रवाना झाले. अहमदाबाद येथून ४६ प्रवासी कोल्हापूरला आले. कोल्हापूरहून ५१ जण अहमदाबादला गेले. त्यात पुढे नागपूरला जाणारे आठ प्रवासी होते.
प्रतिक्रिया
नव्या बदलानुसार अहमदाबादमार्गे कोल्हापूर-नागपूर विमानसेवा सुरू झाल्याचा आनंद आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. सध्या कोल्हापूरहून नागपूरला जाता येते. मात्र, नागपूरहून कोल्हापूरला हैदराबादमार्गे यावे लागणार आहे. नागपूरहून अहमदाबादमार्गे कोल्हापूर येण्याची सेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार आहे.
-कमल कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ