अकरा महिन्यांनंतर पुन्हा धावली ‘कोल्हापूर - नागपूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:14+5:302021-03-13T04:44:14+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूर - नागपूर ही द्विसाप्ताहिक रेल्वे शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या ...

'Kolhapur - Nagpur' runs again after eleven months | अकरा महिन्यांनंतर पुन्हा धावली ‘कोल्हापूर - नागपूर’

अकरा महिन्यांनंतर पुन्हा धावली ‘कोल्हापूर - नागपूर’

Next

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूर - नागपूर ही द्विसाप्ताहिक रेल्वे शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या रेल्वेतून पहिल्या दिवशी २२५ जणांनी प्रवास केला. या रेल्वेची आठवड्यातून दोनवेळा सेवा मिळणार आहे.

कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता ही रेल्वे निघाली. त्यासाठी बारा वाजल्यापासून प्रवासी स्थानकावर येऊ लागले. त्यात मिरज, उस्मानाबाद, पंढरपूर, सांगोला, वाशिम, नागपूर, आदी ठिकाणी जाणाऱ्यांचा समावेश होता. या प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले होते. कोल्हापूर, मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, मुर्तजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनीमार्गे ही रेल्वे नागपूरला पोहोचणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी कोल्हापुरातून तर नागपूरमधून दर मंगळवारी, शनिवारी ही रेल्वे सुटणार आहे. नागपूरहून कोल्हापूरला येण्यासाठी सुमारे ४०० प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले आहे. दरम्यान, इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझमच्यावतीने शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास निघणाऱ्या ‘कोल्हापूर दर्शन’ रेल्वेची तयारी कोल्हापूर स्थानकावर सुरू होती. कोल्हापूर, पुरी-गंगोत्री, आदी ठिकाणी पर्यटन करण्यासाठी या रेल्वेतून ६०० जण प्रवास करणार असल्याचे रेल्वेचे पर्यटन सहाय्यक विजय कुंभार यांनी सांगितले.

चौकट

नागपूरहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी व्हावी

नागपूरला जाण्यासह तेथून येण्यासाठी दोन रेल्वे सुरू झाल्या आहेत. त्यातील एक दररोज नियमितपणे येते. नागपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे तेथून रेल्वेने कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने रेल्वे स्थानकावर उपलब्ध करावी, अशी मागणी पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

मशीन दुरूस्तीच्या कामानिमित्त कंपनीच्यावतीने मी वाशिमला जात आहे. कोल्हापूर - नागपूर रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ, खर्च वाचणार आहे. या रेल्वेने चांगली सोय झाली आहे.

- प्रतीक मुळे, उमा टॉकीज परिसर, कोल्हापूर.

फोटो (१२०३२०२१-कोल-कोल्हापूर रेल्वे ०१ ते ०५) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरा महिन्यांनंतर कोल्हापुरातून शुक्रवारी नागपूरच्या दिशेने रेल्वे निघाली. पहिल्या दिवशी २२५ जणांनी प्रवास केला. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: 'Kolhapur - Nagpur' runs again after eleven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.