‘कोल्हापूर-नागपूर’ रेल्वे १२ मार्चपासून पुन्हा धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:36 AM2021-02-26T04:36:56+5:302021-02-26T04:36:56+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूर-नागपूर रेल्वे दि. १२ मार्चपासून पुन्हा धावणार आहे. आठवड्यातून दोनवेळा ही ...
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूर-नागपूर रेल्वे दि. १२ मार्चपासून पुन्हा धावणार आहे. आठवड्यातून दोनवेळा ही रेल्वे असणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी कोल्हापुरातून, तर नागपूरमधून दर मंगळवारी, शनिवारी ही रेल्वे सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. कोल्हापूर-धनबाद रेल्वेसाठी गांधीनगर, हातकणंगले, जयसिंगपूर येथे थांबा करण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून दि. १२ मार्च रोजी दुपारी पावणेएक वाजता ही रेल्वे निघणार आहे. नागपूरमधून दि. १३ मार्चला दुपारी सव्वा तीन वाजता कोल्हापूरच्या दिशेनेही रेल्वे निघणार आहे. अकरा महिन्यांनंतर ही रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होणार आहे. त्यातून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षित करणे आवश्यक आहे. या रेल्वेमुळे नागपूरला कमी वेळेत पोहोचण्यासाठी कोल्हापूर-धनबाद रेल्वेनंतर आणखी एक रेल्वे प्रवाशांना उपलब्ध झाली आहे, अशी माहिती पुणे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी गुरुवारी दिली. दरम्यान, दर शुक्रवारी कोल्हापूर-धनबाद ही विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू झाली आहे. मात्र, कोल्हापूरमध्ये श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस वगळता अन्य कोणता थांबा नाही. मात्र, सांगली जिल्ह्यातील ढालगाव, कवठेमहांकाळ येथे थांबा आहेत. कोल्हापूरमधील गांधीनगर, जयसिंगपूर, हातकणंगले याठिकाणी थांबा करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
चौकट
चांगला प्रतिसाद मिळेल
कोल्हापूर-धनबाद रेल्वेच्या थांब्यासाठी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कोणता निकष लावला आहे, ते समजत नाही. गांधीनगर, हातकणंगले, जयसिंगपूर येथे थांबा केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. त्याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन संबंधित ठिकाणी थांबा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी हातकणंगले येथील प्रशांत चव्हाण यांनी केली आहे.
कोल्हापूर-नागपूर रेल्वेची वेळ
दर सोमवारी, शुक्रवारी कोल्हापूरहून निघणार : दुपारी पावणेएक वाजता.
मंगळवारी, शनिवारी नागपूरला पोहोचणार : दुपारी १२ वाजता.
नागपूरहून दर मंगळवारी, शनिवारी सुटणार : दुपारी ३.१५ वाजता.
बुधवारी, रविवारी कोल्हापूरला पोहोचणार : दुपारी २ वाजता.