कोल्हापूर : आई-वडीलाविना पोरकी ठरलेल्या ‘नकुशी’ला बालकल्याण संकुलच्या ताब्यात देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:23 PM2018-01-25T12:23:39+5:302018-01-25T12:40:01+5:30
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील प्रसूती विभागात पोटच्या एक महिन्याच्या बालिके (नकुशी) ला सोडून आईने पलायन केले आहे. तिचा शोध घेतला असता ती मिळालेली नाही. गेली तीन दिवस सीपीआरचे कर्मचारी या बालिकेचा सांभाळ करत आहेत. तिचे वजन कमी असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. प्रकृती सुधारताच तिला बालकल्याण संकुल प्रशासनाच्या ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयातील प्रसूती विभागात पोटच्या एक महिन्याच्या बालिके (नकुशी) ला सोडून आईने पलायन केले आहे. तिचा शोध घेतला असता ती मिळालेली नाही. गेली तीन दिवस सीपीआरचे कर्मचारी या बालिकेचा सांभाळ करत आहेत. तिचे वजन कमी असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. प्रकृती सुधारताच तिला बालकल्याण संकुल प्रशासनाच्या ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ऊसतोड मजूर महिला सोनाबाई रोहिदास गुलाब राठोड (वय २५, रा. तामाने, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) ही २० जानेवारीला रात्री नऊच्या सुमारास मावशी अनिता चव्हाणसोबत सीपीआरमधील परिचारिकांना काही न सांगता रुग्णालयात बालिकेला सोडून निघून गेल्या. काही वेळाने हा प्रकार परिचारिकांच्या लक्षात आला. त्यांनी दोन दिवस बालिकेच्या आईची प्रतीक्षा केली; परंतु ती परत फिरकली नाही.
याबाबत समाज सेवा अधीक्षक उज्ज्वला सावंत व सुदर्शन गांगुरडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत वर्दी दिली. पोलीस ‘त्या’ बालिकेच्या निष्ठूर मातेचा शोध घेत आहेत. जन्मत:च बालिकेचे वजन १ किलो २ ग्रॅम आहे. साधारणपणे दीड किलोच्या वरती हवे होते. वजन कमी असल्याने तिची प्रकृती नाजूक आहे. तिच्यावर बालरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत. ‘त्या’ बालिकेला मातेच्या दुधाची आवश्यकता आहे.
सध्या वरचे दूध तिला दिले जाते. येथील परिचारिका महिला तिचे संगोपन करत आहेत. आई-वडीलाविना पोरकी ठरलेल्या ‘नकुशी’ची अवस्था पाहून डॉक्टरांसह परिचारिकांचे डोळे भरून येत आहेत. तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर बालकल्याण संकुलाशी संपर्क साधून ताब्यात देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले.