कोल्हापूर : पीक कर्जाच्या नावाखाली बँकेला लाखोंचा गंडा- आकडा आठ कोटींच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:03 AM2018-10-10T01:03:07+5:302018-10-10T01:05:42+5:30
शासनाची पीक व पाईपलाईन कर्ज योजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व आठ अ उतारा सादर करून वरणगे (ता. करवीर) येथील आय.डी. बी.आय. बँकेच्या शाखेला सुमारे २३ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे करीत आहेत
कोल्हापूर : शासनाची पीक व पाईपलाईन कर्ज योजना मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांचे खोटे सातबारा व आठ अ उतारा सादर करून वरणगे (ता. करवीर) येथील आय.डी. बी.आय. बँकेच्या शाखेला सुमारे २३ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील सहाजणांवर करवीर पोलीस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
संशयित राजाराम दादू पाटील, त्यांची पत्नी राणीताई पाटील, त्यांची मुले सचिन आणि सुमित पाटील, सून सुमन सचिन पाटील, रेश्मा सुमित पाटील (सर्व रा. म्हालसवडे,ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस दप्तरी दाखल झालेल्या फसवणुकीचा आकडा लाखात असला तरी सुमारे आठ कोटींची फसवणूक झाली असून, त्यामध्ये ४00 आरोपींचा समावेश आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही पूर्ण खात्री न करता प्रकरणे मंजूर कशी केली, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात बँकेतील काही अधिकारी आरोपीच्या पिंजºयात अडकले आहेत. फसवणुकीची व्याप्ती आणि रॅकेट मोठे असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
अधिक माहिती अशी, संशयितांनी २७ आॅक्टोबर २०१६ ते ३ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत वरणगे (ता. करवीर) येथील आयडीबीआय बँकेत पीक व पाईपलाईन कर्ज मिळण्याकरिता गावातील लोकांचे अर्ज दिले. त्यासोबत म्हालसवडे येथील तलाठ्यांच्या सही-शिक्क्याचे आठ अ आणि सातबारा उतारा देऊन बँकेकडे २२ लाख कर्जाची मागणी केली. कर्ज मंजूर करून घेऊन कर्जाची रक्कम त्यांच्या बँकेतील बचत खात्यावरून काढून घेतली.
बँकेचे शाखाधिकारी सचिन सुरेश शेणवी (वय ३८, रा. नागाळा पार्क) यांना संशय आल्याने त्यांनी करवीर तहसीलदारांना पत्र पाठवून खात्री केली. चौकशीमध्ये उतारे मूळ गाव दप्तरी असलेल्या अभिलेखाशी जुळत नाहीत, असे पत्र तहसीलदारांनी बँकेला दिले. संशयितांनी बनावट उतारे सादर करून, पीक व पाईपलाईन कर्ज प्रकरणाच्या नावाखाली बँकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. या फसवणुक प्रकाराचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे करीत आहेत.