कोल्हापूर : लोहखनिज घोटाळाप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा : नंदकुमार पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:52 AM2018-10-31T11:52:19+5:302018-10-31T11:58:59+5:30
गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोह खनिजाची कवडीमोल भावाने निर्यात करून घोटाळा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंगळवेढ्याचे अॅड. नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रकरणी शासनाने चौकशी आयोग न नेमल्यास २५ जानेवारीला दिल्लीत शास्त्रज्ञांसह उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कोल्हापूर : गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोह खनिजाची कवडीमोल भावाने निर्यात करून घोटाळा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंगळवेढ्याचे अॅड. नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रकरणी शासनाने चौकशी आयोग न नेमल्यास २५ जानेवारीला दिल्लीत शास्त्रज्ञांसह उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पवार म्हणाले, वर्षानुवर्षे येथून कोट्यवधी टन सोने, प्लॅटिनमसारखे मौल्यवान धातू असणारे लोहखनिज कवडीमोल किमतीने चीन, जपान, कोरिया, पाकिस्तान, आदी देशांना निर्यात होत आहे. १९७६ मध्ये सिंधुदुर्गमधील लोहखनिजातील लोहाचे प्रमाण पाहताना तत्कालीन भूगर्भ संचालक आर. एस. हजारे यांना सोने, प्लॅटिनमचे अंश आढळून आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांसह शासनाकडे पाठपुरावा केला. देशातील विविध लॅबोरेटरीजचे नमुने घेतले. त्यांच्या तगाद्यामुळे वरिष्ठांनी लोहखनिजाची तपासणी करण्याचे नाटक केले.
१५ व १६ जानेवारी १९९४ ला ‘जुआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया’चे संचालक भोसकर, ज्युआॅलॉजिकल अॅँड मायनिंगचे वरिष्ठ भूवैज्ञानिक कुंभार, डॉ. एम. के. प्रभू ज्युआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सक्सेना यांनी हजारे यांच्यासोबत गोवा व सिंधुदुर्गमधील लोहखनिजाचे १० सॅँपल्सचे प्रत्येकी तीन नमुने गोळा केले. त्यानंतर ते विविध लॅबोरटीजकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांच्या अहवालामध्ये या खनिजात प्लॅटिनम व सोने यांचे प्रमाण आढळले. याबाबत शासनपातळीवर पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले.
ते पुढे म्हणाले, यासंदर्भात २०१५ साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावेळी संबंधित विभागांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून सर्व्हे केल्याचे सांगितल्याने ही याचिका फेटाळली; परंतु यानंतर आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्यावर सर्व्हेच केला नसल्याचे या विभागांनी म्हटले आहे.
यावर नेमलेल्या शहा कमिशनने ५०० हेक्टर जागेवर ३५ हजार कोटींचा लोहखनिज भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. त्यावर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी १० एकरातच घोेटाळा झाल्याचे सांगितले आहे.
यावेळी आर. एस. हजारे, उदय कुलकर्णी उपस्थित होते.