कोल्हापूर : ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य’च्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:35 PM2018-05-08T17:35:50+5:302018-05-08T17:35:50+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासनसेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
कोल्हापूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासनसेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद करून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
कर्मचाऱ्यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी २१ एप्रिल २०१८ रोजी बैठक घेऊन सकारात्मक आश्वासने दिली होती. त्यांची पूर्तता न केल्याबद्दल ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्रिसदस्यीय समिती स्थापण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल. त्यामध्ये संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांना निमंत्रित सदस्य म्हणून घेता येईल.
पहिली बैठक घेऊन त्यामध्ये एन. एच. एम.अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी / कर्मचारी यांच्या समायोजनाच्या दृष्टीने आरोग्य विभाग तसेच ग्रामविकास विभागाची पदभरती थांबविण्याचा निर्णय दहा दिवसांत घेण्यात येईल.
समिती स्थापन झाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीत एन. एच. एम.अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांच्या आर. आर.मध्ये बदल करून समायोजन करण्यात येईल, अशी सकारात्मक आश्वासने आरोग्यमंत्र्यांनी दिली होती.
त्यामुळे यापूर्वीचे आंदोलन स्थागित करण्यात आले होते; परंतु दहा दिवसांचा कालावधी उलटला तरी आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गोसावी, राजकिरण सावडकर, नजिया खान, पूनम चौगले, अलका महाडिक, राणी रजपूत, कौसर बांदर, गौरी कुरुंदवाडे, संदीप पाटील, आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.