कोल्हापूर : चित्रनगरीकडील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 05:25 PM2018-05-23T17:25:54+5:302018-05-23T17:25:54+5:30
आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना दिलासा देण्याची गरज आहे.
कोल्हापूर : आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना दिलासा देण्याची गरज आहे.
आर. के.नगरकडून भारती विद्यापीठ आणि के. आय. टी. कॉलेजला जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी या परिसरात ये-जा करीत असतात; तर या बाजूने हायवेलाही जाता येत असल्याने तीदेखील वाहतूक आता वाढली आहे.
कंदलगाव कमान ते चित्रनगरीशेजारून जाणारा रस्ता हा एकेरी मार्ग आहे. त्यामुळे समोरून एखादा टेम्पो जरी आला तरी दुचाकी रस्त्यावरून खाली घ्यावी लागते. रस्त्याच्या काटाळ्या भरून न घेतल्याने गाडी खाली घेताना आणि पुन्हा रस्त्यावर आणताना नेहमी या ठिकाणी अपघात होत असतात.
येथून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात; त्यामुळे अनेकदा समोरासमोरही अपघातांचे प्रकार घडले आहेत. त्यामुळेच या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. यासाठी केवळ पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र हा निधी अपुरा असल्याने या संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण यामधून होणे शक्य नाही.
आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुन्हा या रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, त्यांचे पालक यांमुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. एका बाजूला चित्रनगरीची भिंत असल्यानेही या कडेने वाहने चालविताना अतिशय दक्षता घ्यावी लागते. यावर उपाय म्हणून विरोधी बाजूचे रुंदीकरण करून भराव टाकून घेण्याची गरज आहे.
पालकांचा जीव टांगणीला
रस्त्याची ही अवस्था असल्याने या ठिकाणी कॉलेजला जाणाºया मुलामुलींच्या पालकांचा जीव दिवसभर टांगणीला लागलेला असतो. संध्याकाळी मुले घरी येईपर्यंत पालकांच्या जिवात जीव नसतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने तातडीने निधी वाढवून या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे.
‘केआयटी’कडील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाच लाख
चित्रनगरी ते केआयटी कॉलेज या ३०० मीटरच्या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी या रस्त्यावरून गाडी चालविण्यापेक्षा रस्त्याच्या कडेने गाडी चालविणे पसंत करतात. मात्र यंदा जिल्हा परिषदेने यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम याच दोन दिवसांत सुरू होण्याची गरज असून ते दर्जेदार झाल्यास विद्यार्थ्यांसाठी हिताचे ठरणार आहे.
शहराबाहेर जाणाऱ्या या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करणे आवश्यक आहे. एकीकडे विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि नागरिकही जवळचा मार्ग म्हणून या मार्गाचा करीत असलेला वापर यांचा विचार करता या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण आवश्यक आहे. या रस्त्यावरून आमची मुले गाड्या घेऊन जातात. मात्र रस्त्याची अवस्था पाहून त्यांच्या हातात गाडी देण्यासाठीही मन धजावत नाही. रस्ता रुंदीकरण लवकर करणे आवश्यक आहे.
विनायक कुलकर्णी
पालक