कोल्हापूर : सौंदत्ती यात्रेतील अडचणीसंदर्भात बैठक घ्यावी : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:26 AM2018-12-12T11:26:18+5:302018-12-12T11:31:59+5:30
सौंदत्ती (कर्नाटक) येथे होणाऱ्या रेणुका यात्रेदरम्यान येणाऱ्या अडचणींसंदर्भात कर्नाटक प्रशासन व संबंधित रेणुका भक्त संघटना यांची व्यापक बैठक घ्यावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
कोल्हापूर : सौंदत्ती (कर्नाटक) येथे होणाऱ्या रेणुका यात्रेदरम्यान येणाऱ्या अडचणींसंदर्भात कर्नाटक प्रशासन व संबंधित रेणुका भक्त संघटना यांची व्यापक बैठक घ्यावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अपर्णा मोरे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातून लाखो भाविक सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी जात असतात. यंदाही २१ डिसेंबरला यात्रा होत आहे.
एस. टी. महामंडळातर्फे प्रतिवर्षी अर्ज, विनंत्या व लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न केल्यानंतर यात्रेसाठी जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा आकार कमी केला जातो. खोळंबा आकाराचा हा खेळखंडोबा थांबवून कायमस्वरूपी संपूर्ण खोळंबा आकार रद्द करावा. सद्य:स्थितीत सौंदत्ती डोंगर येथे रेणुका मंदिरात चार दरवाज्यांपैकी एका दरवाजाने प्रवेश दिला जातो. यात्रा काळातील गर्दी लक्षात घेता, सर्व दरवाजे खुले करावेत.
पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी टॅँकरने मुबलक पाणी पुरवठा करावा. यात्रेला येणाऱ्या अडीअडचणींसंदर्भात स्थानिक प्रशासनाने मोबाईल क्रमांक लोकांना समजतील अशा ठिकाणी लावावेत, रुग्णवाहिकेची सोय करावी, अशा विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासन व कोल्हापूरच्या रेणुका भक्त संघटनांची बैठक जिल्हा प्रशासनाने घ्यावी.
शिष्टमंडळात किशोर घाटगे, संभाजी साळुंखे, महेश उरसाल, प्रसाद जाधव, अच्युत साळोखे, मोहन साळोखे, बाबा पार्टे, अशोक जाधव, रेखा दुधाणे, मनोहर सोरप, सुवर्णा पवार, मधुकर नाझरे, सुनील पाटील, आदींचा समावेश होता.