कोल्हापूर : न्यू गुजरी मित्रमंडळाची लाखाची दहीहंडी, सोमवारी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:28 PM2018-08-29T17:28:35+5:302018-08-29T17:31:01+5:30
कोल्हापूर येथील न्यू गुजरी मित्रमंडळाच्या वतीने सोमवारी (दि. ३) गुजरीचा ‘गोविंदा दहीहंडी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त गुजरी कॉर्नर येथे २५ फूट उंचीची बांधण्यात येणारी दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल.
कोल्हापूर : येथील न्यू गुजरी मित्रमंडळाच्या वतीने सोमवारी (दि. ३) गुजरीचा ‘गोविंदा दहीहंडी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त गुजरी कॉर्नर येथे २५ फूट उंचीची बांधण्यात येणारी दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष नगरसेवक किरण नकाते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
गुजरी कॉर्नर येथे दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी आमदार अमल महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे, कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, माजी महापौर सुनील कदम, रविकिरण इंगवले, सुहास लटोरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
यंदा दहीहंडी उत्सवात अभिनेत्री इहाना ढिल्लन व संगीतसम्राट प्रथमेश मोरे याचे सॅक्सोफोन वादन हे प्रमुख आकर्षण असणार आहे. तसेच बालकलाकार धनिष्ठा काटकर, प्रांजल पालकर, ऐश्वर्या साळवी, नीलम साळवी, निशा बारोत, तन्वी कोलटे यांचे बहारदार नृत्य सादर होणार आहे.
दहीहंडी उत्सवात वायरिंगमुळे धोका निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अंडरग्राउंड वायरिंगचे काम करण्यात आल्याची माहितीही नकाते यांनी यावेळी दिली. परिषदेस हर्षल कटके, विजय सूर्यवंशी, दीपेश पटेल, संतोष खोगरे, सागर राशिंगकर, सत्यजित सांगावकर, आदी उपस्थित होते.
१. भव्य एलईडी स्क्रीन, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, स्टेज स्पेशल इफेक्ट, स्मोक बबल्स, कोल्ड फायर.
२. महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.
३. करवीर गर्जना ढोल पथकाने कार्यक्रमाची सुरुवात.