कोल्हापूर : न्यूझीलंडचे ‘ड्रॅगन फ्रुट’ बाजारात, ‘वरण्या’ची आवक वाढल्याने दरात घसरण : साखर, गूळ तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:19 AM2018-07-30T11:19:31+5:302018-07-30T11:25:03+5:30
डेंग्यूमूळे शरीरातील रक्तपेशी कमी होतात. त्यांची भरपाई करण्यासाठी ‘किव्ही’ फळ खाण्यास दिले जाते. आता ‘किव्ही’बरोबरच न्यूझीलंड येथील ‘ड्रॅगन फ्रुट’ बाजारात आले आहे. गडद रंगाचे हे फळ ग्राहकांचे आकर्षण बनले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये मोठी चढउतार दिसत नसली तरी ‘वरण्या’ची आवक वाढल्याने त्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. साखर व गुळाच्या दरांत थोडी वाढ झाली आहे.
कोल्हापूर : डेंग्यूमूळे शरीरातील रक्तपेशी कमी होतात. त्यांची भरपाई करण्यासाठी ‘किव्ही’ फळ खाण्यास दिले जाते. आता ‘किव्ही’बरोबरच न्यूझीलंड येथील ‘ड्रॅगन फ्रुट’ बाजारात आले आहे. गडद रंगाचे हे फळ ग्राहकांचे आकर्षण बनले आहे. भाजीपाला मार्केटमध्ये मोठी चढउतार दिसत नसली तरी ‘वरण्या’ची आवक वाढल्याने त्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. साखर व गुळाच्या दरांत थोडी वाढ झाली आहे.
कोल्हापूर शहराला डेंग्यूच्या आजाराने विळखा घातला आहे. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांच्या शरीरातील रक्तपेशी गतीने वाढाव्यात, यासाठी ‘किव्ही’ फळ खाण्यास दिले जाते.
‘किव्ही’बरोबरच ‘ड्रॅगन फ्रुट’ही दिले जाते. ‘ड्रॅगन’ हे फळ न्यूझीलंड येथील असून, सध्या कोल्हापूर बाजार समितीत त्याची आवक झालेली आहे. दिसायला लहान अननसासारखे असणारे हे फळ वरून सोलले की आत ‘गर’ असतो. तो खाण्यास दिल्यानंतर रक्तपेशी वाढतात. साधारणत: एक फळाची किंमत ५० रुपये आहे. पपईलाही मागणी असून पिवळीधमक पपई बाजारात दिसत आहेत.
फळबाजारात अननस, तोतापुरी, डाळिंब या फळांची रेलचेल दिसते. दूध आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलन व त्यानंतर वाहतूकदारांच्या संपामुळे फळबाजारात शांतता होती. गेले दोन दिवस मालाची आवक हळूहळू होऊ लागली आहे. चेन्नई, बंगलोर येथून तोतापुरी आंब्यांची आवक सुरू असून आंब्याचा दर दहा ते वीस रुपयांपर्यंत आहे. नीलम आंब्याची आवकही अद्याप सुरू असून बॉक्स दर ५० रुपये आहे.
भाजीपाला बाजारावरही वाहतूकदार संपाचा परिणाम झाल्याने आवक मंदावली आहे; पण आता आवक पूर्ववत सुरू झाल्याने दरात फारसा चढउतार दिसत नाही. कोबी, वांगी, टोमॅटो, गवार, वरणा या प्रमुख भाज्यांच्या दरांत थोडी घसरण झाली आहे.
‘वरणा’ची आवक जास्त असल्याने दर एकदमच खाली आले आहेत. किरकोळ बाजारात वरणा २० रुपये किलोपर्यंत आलेला आहे. कोथिंबिरीची आवक स्थिर असल्याने दरात फारसा फरक दिसत नाही. कांदापात, मेथी व पोकळा या भाज्या १० रुपये प्रतिपेंढी आहेत.
हरभरा डाळीच्या दरात थोडी वाढ झाली असून तूरडाळ, मसूरडाळीसह इतर डाळींचे दर स्थिर आहेत. घाऊक बाजारात साखर ३४ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गुळाची मागणीही वाढू लागल्याने दर ३२ रुपयांपर्यंत दर आहे. सरकी तेल, शेंगतेलाच्या दरात चढउतार दिसत नाही.
श्रावणाच्या पार्श्वभूमीवर शाबू वधारणार
सध्या शाबूसह उपवासाच्या पदार्थांचे दर स्थिर असले तरी श्रावणाच्या पार्श्वभूमीवर दर वाढणार हे निश्चित आहे. शाबूचे दर सध्या हळूहळू चढू लागले आहेत.