दक्षिण विधानसभा मतदारसंघात रंगलय पोस्टरवॉर; विकासकामांच्या पंचनाम्यावरून कलगीतुरा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 02:47 PM2024-10-12T14:47:28+5:302024-10-12T14:49:52+5:30
वर्दळीच्या रस्त्यारस्त्यावर प्रत्येक प्रभागात ग्रामपंचायती नजीक एकमेकांविरुद्ध उभारण्यात आलेल्या विकासकामांचा पंचनामा करणाऱ्या पोस्टरने दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
अमर पाटील
कोल्हापूर- कळंबा पालिका हद्दीतील समाविष्ट विविध प्रभाग आणि लगतच्या ग्रामपंचायती यांची सरमिसळ होऊन बनलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील यांच्या ' वारसा विकासाचा दक्षिणच्या प्रगतीचा' विरुद्ध माजी आमदार अमल महाडिक यांच्या दक्षिण' प्रॉब्लेम अशा आशयाची पोस्टरे सर्वत्र झळकत आहेत. वर्दळीच्या रस्त्यारस्त्यावर प्रत्येक प्रभागात ग्रामपंचायती नजीक एकमेकांविरुद्ध उभारण्यात आलेल्या विकासकामांचा पंचनामा करणाऱ्या पोस्टरने दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
पक्षीय राजकारणा आडून पुन्हा पारंपरिक पाटील महाडिक गटात एकमेकांच्या विकासकामांचे वाभाडे काढण्याची चांगलीच जुंपली आहे. पाच वर्षे शांत असणाऱ्या मतदारसंघातील पाटील महाडिक गटाचे राजकारण पुन्हा ढवळून निघायला सुरवात झाली आहे. मतदारसंघात विकासकामांच्या निमित्ताने गाठीभेटीला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील दक्षिण विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे.
२००९ च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी सतेज पाटील यांनी बाजी मारली २०१४ च्या निवडणुकीत सतेज पाटील यांना पराभूत करत नवख्या अमल महाडिक यांनी विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकीत ऋतुराज पाटील यांनी अमल महाडीकांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. येथे मतदारसंघात मतदारांचा कौल सहजासहजी लक्षात येते नाही, गेल्या तिन्ही निवडणुकीत प्रत्येकवेळी वेगवेगळे उमेदवार निवडून आले आहेत हे विशेष . परंतु पक्षीय राजकारण पाहता दोन वेळा काँग्रेस तर भाजप एकदा विजय मिळवला आहे.
चाणाक्ष मतदारराजाच ठरवेल
येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयाची हॅट्ट्रिक करणार की भाजप कमबॅक करणार हे गुलदस्त्यात असले तरी निवडणूकीआधी सुरू झालेल्या पोस्टरवॉरने निवडणूकीआधी राजकारण ढवळून निघाले आहे. खरी दंगल पाटील- महाडिक गटातच दक्षिण विधानसभा मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा गतातटाची समीकरणे प्रभावी ठरतात. येथे पाटील- महाडिक गट अशीच निवडणूक रंगते आमदार ऋतुराज पाटील दुसऱ्यांदा बाजी मारणार की दुसऱ्यांदा अमल महाडीक कमबॅक करणार हे चाणाक्ष मतदारराजाच ठरवेल.