दरीतला रस्ता गाठला आणि धावत्या स्कूल बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 10:49 PM2022-09-06T22:49:42+5:302022-09-06T22:51:11+5:30
चालकाला त्रास होत असतानाही प्रसंगावधान राखत त्यांनी विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले.
राजेंद्र पाटील
भोगावती : पिंपळवाडी (ता राधानगरी) या गावातील भोगावती हायस्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांना घेऊन येत असलेल्या बसचा चक्क काळ पाठलाग करत होता. खोल दरी असलेला अर्धा किलोमीटरचा रस्ता पार करून आल्यानंतर बसचालक सतीश सातापा कांबळे (वय ३५) रा.कौलव याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अवघ्या मिनिटापूर्वीच बसने दरीचा भाग पार केला होता.
याबाबत सविस्तर घटना अशी आहे, पिंपळवाडी येथून भोगावती हायस्कूल ला येण्यासाठी एक किलोमीटर पायी प्रवास करून गाडी पकडावी लागते. विद्यार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी भोगावती हायस्कूलच्या वतीने या विद्यार्थ्यांना बसची सोय करण्यात आलेली होती. मात्र आज प्रचंड मोठी दुर्घटना टळली. पिंपळवाडी ते भोपळवाडी दरम्यान मोठी दरी आहे. हा रस्ता एकेरी वाहतुकीचा आहे.त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आज दुपारी या दीड किलोमीटरच्या मार्गावर ही बस पिंपळवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन बरगेवाडी पोहचत असतानाच चालकाला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. परंतु असं असतानाही विद्यार्थ्यांचे प्राण वाचावे यासाठी त्यांनी प्रयत्न करत चालू गाडी बंद करून प्राण सोडला.
सतीश कांबळे यांच्या मृत्यूनंतर या बसमधून प्रवास केलेल्या मुलांचा व पालकांचा एकच कल्लोळ उडाला. महिलांना रडू आवरेना तर विद्यार्थी थरथर कापत होते. एवढी भीतीदायक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती. तात्काळ बस चालकाला कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला. सतीश कांबळे यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले असा परिवार आहे.