कोल्हापूर : गोंविंद पानसरे हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 07:02 PM2018-02-26T19:02:27+5:302018-02-26T19:02:27+5:30
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी व सध्या जामिनावर बाहेर असलेला डॉ. वीरेंद्र तावडे याचा पंचनाम्यावेळी जप्त केलेला पासपोर्ट संशयित आरोपीचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी येथील जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सोमवारी जमा केला.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी व सध्या जामिनावर बाहेर असलेला डॉ. वीरेंद्र तावडे याचा पंचनाम्यावेळी जप्त केलेला पासपोर्ट संशयित आरोपीचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी येथील जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सोमवारी जमा केला.
पानसरे हत्याप्रकरणाची सुनावणी बिले यांच्या न्यायालयात झाली. यावेळी अॅड. पटवर्धन यांनी युक्तिवाद केला. अॅड. पटवर्धन यांचे म्हणणे ऐकून याची पुढील सुनावणी दि. १७ मार्चला होणार असल्याचे बिले यांनी यावेळी स्पष्ट केले.
अॅड. समीर पटवर्धन यांनी, पानसरे हत्याप्रकरणातील मुख्य संशयित व सध्या जामिनावर बाहेर असलेला समीर गायकवाड याच्यावर दोषारोप निश्चितीची (चार्जफ्रेम) सुनावणी ही सात मार्चला उच्च न्यायालयात होणार आहे, असा युक्तिवाद केला.
यावेळी अॅड. पटवर्धन यांनी, तावडेचा जप्त केलेला पासपोर्ट न्यायालयात यावेळी जमा केला. सुनावणीवेळी सरकारी वकील हजर नव्हते. सुनावणी झाल्यानंतर अॅड. समीर पटवर्धन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, पानसरे हत्याप्रकरणात संशयित डॉ. वीरेंद्र तावडेला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने जामीन दिला आहे. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातही तावडेला जामीन मिळावा, यासाठी पुण्याच्या सीबीआय न्यायालयात दुसऱ्यांदा अर्ज करणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी तावडेला जामीन मिळावा यासाठी न्यायालयात पहिल्यांदा अर्ज केला होता. न्यायालयाने तो जामीन फेटाळला होता.