कोल्हापूर : महापालिकेच्या दहा शाळा मॉडेल स्कूल बनविणार, शिक्षण समितीच्या अंदाजपत्रकात संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:08 PM2018-03-08T12:08:39+5:302018-03-08T12:08:39+5:30
इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळा सुरू करणे, निवडक दहा शाळांना मॉडेल स्कूल बनविणे तसेच सर्व शाळांतून ई-लर्निंगसाठी सर्व सुविधायुक्त प्रोजेक्टर पुरविण्याचा कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचा संकल्प आहे. समितीच्या सभापती वनिता देठे व प्रभारी प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी बुधवारी समितीचे सन २०१७-१८ सालाचे सुधारित व सन २०१८-१९ सालाचे नवीन अंदाजपत्रक कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे यांच्याकडे सादर केले.
कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती वनिता देठे व प्रभारी प्रशासन अधिकारी विश्वास सुतार यांनी बुधवारी समितीचे सन २०१७-१८ सालाचे सुधारित व सन २०१८-१९ सालाचे नवीन अंदाजपत्रक कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे यांच्याकडे सादर केले. इंग्रजी माध्यमाच्या तीन शाळा सुरू करणे, निवडक दहा शाळांना मॉडेल स्कूल बनविणे तसेच सर्व शाळांतून ई-लर्निंगसाठी सर्व सुविधायुक्त प्रोजेक्टर पुरविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
शिक्षण समितीचे शासन व महापालिकेचा हिस्सा असे एकूण रक्कम रुपये ४७ कोटी ३३ लाखांचे अंदाजपत्रक असून यामध्ये महापालिकेच्या फंडातून रुपये ३१ कोटींच्या अनुदानाची मागणी केली आहे. यातील बहुतांश खर्च हा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगारावर होणार आहे.
महापालिकेच्या १३ प्राथमिक शाळांमध्ये सेमी-इंग्रजी वर्ग सुरू असून नवीन तीन सेमी-इंग्रजी प्राथमिक शाळा सुरू करण्याचा मानस आहे. त्यासाठी आवश्यक अर्हताप्राप्त शिक्षकवर्ग तसेच आवश्यक शैक्षणिक साधने, सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांची या शैक्षणिक युगात निकड भासत असल्याने १० शाळा मॉडेल स्कूल बनविण्याचा दृष्टिकोनातून आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याकरिता अंदाजपत्रकामध्ये रुपये २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
इयत्ता पहिली व दुसरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘कोल्हापूर प्रज्ञाशोध परीक्षा’ सुरू करण्यात आलेली आहे. सदरच्या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येत आहेत. परीक्षेत ९० पेक्षा अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची एप्रिल २०१८ मध्ये अंतिम परीक्षा घेण्यात येणार असून, गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र तसेच पात्र विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
राजर्षी शाहू शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या गुणवत्ता यादीमधील पहिल्या गुणवत्ताधारक पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा रुपये २०० प्रमाणे वार्षिक रुपये २४०० शिष्यवृत्ती, ट्रॉफी व प्रशस्तीपत्र तसेच पात्र विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.