कोल्हापूर : प्राधिकरण नकोच, यावर ४२ गावे ठाम,पालकमंत्र्यांसोबत आठ दिवसांत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:21 AM2018-09-04T11:21:11+5:302018-09-04T11:24:15+5:30
प्राधिकरणाला विरोध करणारे गावसभांचे ठराव पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तिन्ही आमदारांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
कोल्हापूर : गेल्या वर्षभरात प्राधिकरण म्हणजे काय आणि ते झाल्यानंतर काय अडचणी येणार हेच ग्रामस्थांना माहीत नाही. यासाठी ४२ गावांचा दौरा करून जनजागृती करू, पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची भेट घेऊन विरोध दर्शवू, एवढे करून सरकार दडपशाहीने प्राधिकरण लादणार असेल, तर जनहित याचिका दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्राधिकरण विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर प्राधिकरणाला विरोध करणारे गावसभांचे ठराव पालकमंत्री चंद्रकांत पाटील व तिन्ही आमदारांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
प्राधिकरण विरोधी कृती समितीची बैठक करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी कृती समितीचे निमंत्रक व करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी होते.
प्रास्ताविकात वडणगेचे सरपंच सचिन चौगले म्हणाले, प्राधिकरणाच्या फायदे-तोट्यांची माहिती झाली असून, आता याला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला विकास पाहिजे पण विकासासाठी आम्ही भूमिहीन होणार असेल तर तसा विकासच नको. इतर ठिकाणी जमिनी घेतल्या त्या पडीक होत्या, आमच्या पिकाऊ जमिनी असल्याने त्या देवून भिकेला लागायचे का? असा सवाल केला.
गावठाण्यात आहेत तेवढीच घरे नियमित करून उर्वरित बांधकामे बेकायदेशीर ठरवून त्यावर दंड आकारणार. या दंडाच्या रकमेतून आमचा विकास करणार, आम्हाला लुटून कोण विकास करणार असेल, तर तो कदापि मान्य करणार नसल्याचा इशारा अशोक पाटील (शिंगणापूर) यांनी दिला.
प्रा. बी. जी. मांगले म्हणाले, कोणत्याही प्रश्नांचे सार्वत्रिकरण झाल्याशिवाय त्याची उकल होत नाही. जनहित याचिकेचा पर्याय सर्वांत शेवटचा आहे. तत्पूर्वी लोकप्रतिनिधींना निवेदने देऊच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ४२ गावांत जाऊन जनजागृती केली पाहिजे. तेथील लोकांना या रेट्यात सहभागी करून घेतले तरच प्राधिकरणविरोधात जनआंदोलन उभे राहील.
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनाही या लढ्यात सहभागी करून घेऊया, अभ्यासू लोकांची समिती स्थापन करून प्राधिकरण का नको, आम्हाला काय हवे आहे, याचा आराखडा मंत्र्यांकडे चर्चेला जाताना हवा. जी. आर. कुलकर्णी (कोल्हापूर) यांनी विकासाच्या दृष्टीने प्राधिकरण कसे योग्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जोरदार विरोध झाला.
प्राधिकरणामुळे जमिनी जाऊन भीक मागण्याची वेळ येईल, लोकांना भिकेला लावून कोण विकास साधणार असेल तर त्याला विरोधच राहील, असे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी ठणकावून सांगितले.
शरद निगडे (नागदेववाडी), प्रकाश पाटील (नेर्ली), संदीप पाटील (वाशी), प्रताप साळोखे (कळंबा) यांनी मनोगत व्यक्त केले. शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे, अमर पाटील, कृष्णात धोत्रे, विश्वास कामिरे, आदी उपस्थित होते.
दरम्यान, राजेंद्र सूर्यवंशी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. आठवड्याभरात याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.
जमीन मालकांवर वॉचमनची वेळ
पिंपरी चिंचवड प्राधिकरणासारखे दिवास्वप्न दाखवले जाते. भूसंपादनातून ग्रामस्थांकडे पैसा आला, बंगला-गाड्या झाल्या पण कालांतराने पैसे संपले आणि हीच मंडळी ज्यांना जमिनी विकल्या त्यांच्या दारात वॉचमन म्हणून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे सचिन चौगले यांनी सांगितले.
‘लोकमत’चे अभिनंदन
राज्यात ज्या शहरांत प्राधिकरण झाले, तेथील वस्तुस्थिती ‘लोकमत’ने अभ्यासपूर्णरित्या मांडले. प्राधिकरणाचा बुरखा फाडून सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याचे सांगत करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, पंडित लाड (निगवे दुमाला), अशोक पाटील (शिंगणापूर) आदींनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.
सूर्यवंशींचा सदस्यत्वाचा राजीनामा
त्या तालुक्याचे सभापती हे प्राधिकरण समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. पण प्राधिकरणाला ४२ गावांचा विरोध असेल, तर आपण जनतेसोबत राहू, असे सांगत करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले.