Kolhapur North Assembly by-election: भाजपचा विजयी निश्चीत पण मताधिक्क घटणार - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 07:52 PM2022-04-12T19:52:56+5:302022-04-12T20:13:13+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. काही ठिकाणी झालेल्या वादावादीच्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. काही ठिकाणी झालेल्या वादावादीच्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण झाले होते. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळी ६ नंतर मतदान प्रक्रिया संपताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत या निवडणुकीत भाजपचा विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.
यापत्रकार परिषदेस भाजपचे नेते, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे उमेदवार सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, महेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, जेव्हा मताचा आकडा वाढतो त्यावेळी याचा फायदा भाजपलाच होतो. याचे कारण की भाजपा खूप मोठा वर्ग असा आहे की तो मतदानाला जाण्यास कंटाळतो. मात्र या निवडणुकीत मताचा टक्का वाढल्याने भाजपचाच विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने मात्र मताधिक्क कमी होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मतदार, प्रशासन तसेच प्रसारमाध्यमांचे आभार मानले.
२०-२५ कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा सत्ताधाऱ्याचा प्लॅन
या निवडणुकीत प्रशासनावर प्रचंड दबाब होता. सत्ता कशी वापरावी हे या सत्ताधाऱ्यांकडून शिकले पाहिजे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. प्रशासनाला सर्व नियमाच्या चौकटी तोडायला लावल्याचा आरोपही त्यांनी केला. काल पैसे वाटले म्हणून किमान २०-२५ कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा या सत्ताधाऱ्याचा प्लॅन होता असेही ते म्हणाले. मात्र कोणत्याही केसस मध्ये काहीही निष्पण झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.