तीन लाख कार्यकर्ते? ..तर कोणी भीक घालणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:26 AM2022-03-29T11:26:40+5:302022-03-29T11:31:28+5:30
दुर्देवाने काही वेगळे घडले तर, आघाडीला मोठी किंमत माेजावी लागेल. एखादी जागा गेली तर त्याचा परिणाम सरकारवर हाेतो. कारभारावरील नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू होते,त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहू नका असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर : पाच राज्यातील विजयाने मदमस्त झालेले भाजप एका विधवा भगिनीला हरवण्यासाठी राज्यातील तीन लाख कार्यकर्ते आणणार आहे. हा कोल्हापूर शहराचा अपमान आहे. कोल्हापूरकरांचा इगो दुखावून कोणी मते मागत असेल तर कोणी भीक घालणार नाही. येथे लढाई सुरू आहे काय? एवढेच चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल तर, त्यांनी युक्रेनच्या मदतीसाठी कार्यकर्ते पाठवून द्यावेत, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
कोल्हापूर उत्तरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे आयोजित प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले,चंद्रकांत जाधव यांनी अडीच वर्षाच्या काळात कोल्हापूर शहराच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून काम सुरू केले होते. मात्र दुर्देवाने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले, त्याची पूर्तता करण्यासाठी जयश्री जाधव या भगिनी आपल्याकडे ओवाळणी मागायला आल्या आहेत. त्यांच्या पदरात मताची ओवाळणी टाकून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.
उमेदवार जयश्री जाधव म्हणाल्या, शिवाजी पेठ आणि स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचे वेगळे नातं होते. गांधी मैदानासह पेठेतील इतर विकासकामांची तळमळ त्यांच्या मनात होती. एक बहीण म्हणून मला मताची ओवाळणी द्या, तुमची ओवाळणी वाया जाऊ देणार नाही. यावेळी विक्रम जरग, अजित राऊत, रविकिरण इंगवले, ॲड. अशोकराव साळोखे, सचिन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. माजी महापौर उदय साळोखे, अजित खराडे, इंद्रजीत बोंद्रे, उत्तम कोराणे, परीक्षित पन्हाळकर, शिवाजीराव जाधव, मंजीत माने आदी उपस्थित होते.
तर आघाडीला किंमत मोजावी लागेल
दुर्देवाने काही वेगळे घडले तर, आघाडीला मोठी किंमत माेजावी लागेल. एखादी जागा गेली तर त्याचा परिणाम सरकारवर हाेतो. कारभारावरील नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू होते,त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहू नका असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
शिवाजी पेठ एकसंघपणे उभी
शिवाजी पेठ एकसंघपणे जयश्री जाधव यांच्या मागे उभी आहे. त्यामुळे विरोधकांना शिवाजी पेठेत बुथ लावायला कार्यकर्ते मिळणार नसल्याचे अजित राऊत यांनी सांगितले.