कोल्हापूर 'उत्तर’ची पोटनिवडणूक : पैसे वाटणाऱ्या सहा जणांवर गुन्हे, तीन ठिकाणी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 11:38 AM2022-04-12T11:38:08+5:302022-04-12T11:40:50+5:30
‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक चुरशीची होत असून मतदारांना विविध प्रलोभने दाखवून मतदान आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक चुरशीची होत असून मतदारांना विविध प्रलोभने दाखवून मतदान आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न झाला. मतदानाच्या पूर्वसंध्येला सोमवारी वारे वसाहत, मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिर, दसरा चौकातील सुतारवाडा परिसरात मतदारांना पैशाचे वाटप करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी भरारी पथकांनी दिलेल्या तक्रारीनुसार जुना राजवाडा व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हे नोंदवले. तर तिन्हीही घटनेतील १ लाख २६ हजार ३० रुपये पोलिसांनी जप्त केले.
आज, मंगळवारी मतदान होणार असल्याने मतदारांना पैशाची प्रलोभने दाखविण्याची शक्यता असल्याने निवडणूक विभागाची भरारी पथके, पोलीस पथके तसेच विरोधकांची कार्यकर्त्यांची फळी सतर्क झाली होती. त्यातूनही मतदारांना पाकिटातून पैसे वाटण्याचे प्रसंग घडले. त्यावर काही मतदारांची नावेही मिळून आली. गुन्हा दाखल सहा जणांवर भा. दं. वि. कलम १७१ ई प्रमाणे अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.
- वारे वसाहत (संभाजीनगर परिसर) : मोपेड टाकून अज्ञात पळाला. मोपेड जप्त, अज्ञात मोपेड (नं. एमएच ०९, ईटी ३१७५) चालकावर गुन्हा दाखल. कारवाईत मोपेडच्या डिकीत ४० हजारांची रोकड, ५०० रुपये असलेली दोन पांढरी पाकिटे मिळाली.
- जय पद्मावती मंदिर (मंगळवार पेठ) : अशोक शंकरराव देसाई (वय ५७, रा. फुलेवाडी रिंगरोड), विजय महादेव जाधव (४८, रा. राजारामपुरी ४ थी गल्ली), संतोष सदाशिव माळी (४०, रा. मंगळवार पेठ) यांच्यावर गुन्हे दाखल. कारवाईत ४५,५०० रुपये जप्त
- सुतारवाडा (दसरा चौक) : प्रवीण जयवंत कणसे (रा. भोसलेवाडी), जोतीराम तुकाराम जाधव (४४, रा. न्यू शाहूपुरी, घोरपडे गल्ली. मूळ- जयसिंगपूर) यांच्यावर गुन्हे दाखल. कारवाईत ३९,५३० रुपये जप्त केले.
भाजपने पैसे वाटल्याच्या तक्रारी पराभवाच्या नैराश्येतून; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या महाविकास आघाडीच्या तक्रारी या पराभवाच्या नैराश्येतून केल्या असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी रात्री पत्रकारांशी बोलताना केली. बुथवरील कार्यकर्त्यांना जेवणाचे पैसे द्यायचे नाहीत का, त्यांच्याकडे काय लाखाचे डबोले सापडले की काय, अशी विचारणाही त्यांनी केली. आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तरसाठी आज मतदान होत आहे. आमचे कार्यकर्ते बुथ रचनेची माहिती घेत फिरत आहेत. बुथवर काम करणाऱ्या लोकांच्या जेवणासाठी म्हणून त्यांना काही रक्कम दिली जात असताना, त्यांच्याविरुध्द पैसे वाटताना सापडले म्हणून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. परंतु अशा गुन्ह्यांना भाजप घाबरत नाही. पोलीस यंत्रणांचा वापर करून ही दडपशाही सुरू आहे. या मतदार संघात भाजपचा विजय होणार हे नक्की असल्यानेच, शेवटचा प्रयत्न म्हणून कार्यकर्त्यांना असा त्रास दिला जात आहे.