कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: हॉटेल्स फुल्ल, जेवणावळी जोरात, यंत्रणा अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 02:03 PM2022-04-09T14:03:59+5:302022-04-09T14:04:29+5:30

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या आधी पेटीएमवर पैसे आल्यास ईडीची भीती चक्क मतदारांनाच घातली होती. आता सध्या कोल्हापुरात जे सुरू आहे, त्याची चौकशी कोण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Kolhapur North By-Election: Hotels are full, diners are loud, system is ignorant | कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: हॉटेल्स फुल्ल, जेवणावळी जोरात, यंत्रणा अनभिज्ञ

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक: हॉटेल्स फुल्ल, जेवणावळी जोरात, यंत्रणा अनभिज्ञ

googlenewsNext

कोल्हापूर : प्रचारासाठी मुंबईपासून विदर्भापर्यंतचे नेते, कार्यकर्ते कोल्हापुरात आल्याने हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. कार्यकर्त्यांना जेवणाची कुपन्स वाटली जात आहेत. अपार्टमेंट, कॉलन्यांमध्ये जेवणावळी झडत असल्याचे चित्र सध्या कोल्हापुरात दिसत आहे. विशेष म्हणजे याबद्दल निवडणूक यंत्रणा अनभिज्ञ आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या आधी पेटीएमवर पैसे आल्यास ईडीची भीती चक्क मतदारांनाच घातली होती. आता सध्या कोल्हापुरात जे सुरू आहे, त्याची चौकशी कोण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

राज्यभरातून माजी मंत्री, आमदार, माजी आमदार, महापौरांसह पक्षाच्या विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांची फौजच भाजपने कोल्हापुरात आणली आहे. एका नेत्याबरोबर चार-पाच कार्यकर्ते आले आहेत. त्यांची व्यवस्था हॉटेल्समध्ये करण्यात आल्याने हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. प्रत्येकाकडे विशिष्ट जबाबदारी देण्यात आली आहे. दलित मतदार मुख्यत: काँग्रेसच्या पाठीशी असतो म्हणून शहरातील दलित वसाहती, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन केंद्र सरकार व देवेंद्र फडणवीस सरकारने तुमच्यासाठी कशा योजना राबविल्या हे सांगितले जाते. आपण काय केले हे सांगतानाच काँग्रेसने काय केले नाही, हे जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

धार्मिक धुव्रीकरणासाठी सुरुवातीच्या टप्प्यात काश्मीर फाईल्स चित्रपटाची तिकिटे वाटप करण्यात आली होती. आता त्याच यंत्रणेकडून जेवणाची कुपन्स दिली जात आहेत. त्यामुळे मुख्यत: मांसाहारी खाणावळी, हॉटेल्स गर्दीने तुडुंब आहेत. अर्धा-अर्धा तास थांबल्याशिवाय जेवण मिळत नाही, असाही अनुभव येत आहे. निवडणूक विभागाकडे रोज सादर होणाऱ्या खर्चामध्ये हा खर्च मात्र कुठेच येत नाही.

लोकसभा पडली मागे...

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदार संघ आहेत. या दोन्ही मतदार संघाच्या निवडणुकीत जेवढा खर्च झाला नसेल तेवढा खर्च दोन्ही पक्षांकडून या एका जागेच्या पोटनिवडणुकीवर केला जात आहे.

रामनवमीला झेंडे वाटणार

निवडणूक असल्याने रविवारी असलेल्या रामनवमीला यंदा कमालीचे महत्त्व आले आहे. त्या दिवशी जय श्रीराम लिहिलेले झेंडे घरोघरी वाटण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. त्यासाठी पुण्यातून हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत. कोल्हापुरात रामनवमीनिमित्त अंबाबाई मंदिरात प्रतिवर्षी सायंकाळी पारंपरिक उत्साहात रामाचा रथ काढण्याची प्रथा आहे. परंतु त्याला कधीच अशी हिंदुत्वाची झालर नव्हती. समस्त श्रीराम भक्त कोल्हापूर असे सांगून उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता बिंदू चौकातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ‘रामराज्य आणूया... प्रत्येक घरावर भगवा फडकवू या,’ असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Kolhapur North By-Election: Hotels are full, diners are loud, system is ignorant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.