कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक: 'जय श्रीराम'ला ‘शाहू महाराज की जय’ने 'उत्तर', घोषणाबाजीने तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:04 PM2022-04-13T12:04:51+5:302022-04-13T12:05:18+5:30
मंगळवार पेठ व शिवाजी पेठेत घडले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे आचारसंहितेची एेशीतैशी झाली.
कोल्हापूर : मतदान सुरु असताना मतदान केंद्राबाहेर भाजप तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यात प्रचंड घोषणाबाजी होण्याचे प्रकार मंगळवारी दुपारी मंगळवार पेठ व शिवाजी पेठेत घडले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे आचारसंहितेची एेशीतैशी झाली.
प्रचाराची सांगता झाली त्या क्षणापासून पक्षाचे ध्वज, स्कार्प अथवा टोप्या परिधान करणे आदर्श आचारसंहितेत बसत नाही; परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह डोकीवर भगवी टोपी, गळ्यात भगवे स्कार्प घालून मतदान केंद्रांना भेटी देण्यास बाहेर पडले. मंगळवार पेठेतील खासबाग रिक्षा स्टॉपजवळील अहिल्याबाई होळकर विद्यालयाजवळ चंद्रकांत पाटील व त्यांचे कार्यकर्ते तेथे पोहोचले.
गाडीतून खाली उतरून मतदान केंद्राकडे जात असताना भगव्या टोप्या, गळ्यात स्कार्प घालण्यावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली. डोकीवर टोप्या घालून मतदान केंद्रात जाऊ शकत नाही, असे कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांना सांगत होते. पोलिसांनीही त्यांना तेथे रोखले. त्यावेळी पाटील यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’चा नारा देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कैलासगडची स्वारी मंदिराच्या बाजूस थांबलेले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते धावत रिक्षा स्टॉपजवळ पोहोचले. त्यांनीही मग ‘जय..श्री ताई’, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. प्रसंग ओळखून पोलिसांनी चंद्रकांत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना तेथून घालविले.
त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांच्या गाड्या शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळेजवळील मतदान केंद्रावर पोहोचल्या. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने युवराज मालोजीराजे छत्रपती आले. पाटील व मालोजीराजे समोरासमाेर येताच ‘जय श्रीराम’, व ‘जय श्री ताई’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले तसेच काही काळ तणावदेखील निर्माण झाला.
वातावरण शांत व्हावे याकरिता चंद्रकांत पाटील व मालोजीराजे यांनी गळाभेट घेतली तरीही दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरुच होती. काही वेळांतच त्याठिकाणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे पोहोचले. पाठोपाठ अन्य पोलीस फौजफाटाही आला. त्यांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना तेथून पांगविले. वातावरण शांत केले. पोलीस अधीक्षकांनी ड्रोनच्या सहाय्याने व्हिडिओ शूटिंग करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उभा मारुती चौकातही घोषणाबाजी..
असाच प्रकार शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात घडला. त्याठिकाणी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम, माजी नगरसेवक जयंत पाटील थांबून होते. त्याचवेळी सरदार तालीमकडून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे चौकात येताच तेथेही घोषणाबाजी सुरू झाली. परंतु पोलिसांनी त्याठिकाणी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले.
सावलीसाठी उभारलेले पेन्डॉल काढल्याने तणाव
भाजपने आपल्या बूथवरील कार्यकर्त्यांसाठी उभारलेले भगव्या आणि पांढऱ्या रंगाचे पेन्डॉल पोलिसांनी काढायला लावल्याने अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या या अरेरावीबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी आठच्या सुमारास शाहू दयानंद मैदानावर उभारण्यात आलेला पेन्डॉल पोलिसांनी काढायला लावला. यानंतर तोरस्कर चौकातही यावरून वाद झाला. राजारामपुरीत तर तीन ठिकाणचे पेन्डॉल पोलिसांनी काढून टाकायला लावले. ज्याच्यावर पक्षाचे चिन्ह नाही असे पेन्डॉल का काढताय अशी विचारणा कार्यकर्ते करत होते. परंतु पोलिसांनी कोणाचेही न ऐकता हे पेन्डॉल काढायला लावले. मात्र काही ठिकाणी कॉग्रेसच्या बूथवरील पेन्डॉलना हात लावला नाही अशी कार्यकर्त्यांनी तक्रार केली.