Kolhapur North By Election Result: कोल्हापूर उत्तरेत महाविकास आघाडीनं उधळला विजयाचा गुलाल; जयश्री जाधव ठरल्या पहिल्या महिला आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 01:21 PM2022-04-16T13:21:38+5:302022-04-16T17:41:11+5:30
पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूर पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होते. मात्र या निवडणुकीत मविआनं बाजी मारली आहे.
कोल्हापूर – गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या रणांगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव(Jayshree Jadhav) यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. भाजपाने या निवडणुकीत सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली होती. मागील महिनाभरापासून कोल्हापूरात भाजपाविरुद्धमहाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होत्या. त्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २६ व्या फेरी अखेर ९६ हजार २२६ मतं तर भाजपाचे सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली. जवळपास १८ हजारांहून अधिक मताधिक्यांनी काँग्रेसचा विजय झाला आहे. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर कोल्हापूरात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली जात आहे. याठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केला. कोल्हापूर उत्तरची जागा राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूर पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं होते.
विजयी उमेदवार जयश्री जाधव काय म्हणाल्या?
चंद्रकांत जाधव यांनी विकासाचं जे स्वप्न पाहिलं होते. परंतु दुर्दैवाने नियतीने त्यांचं स्वप्न अर्धवट राहिले. पत्नी म्हणून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे माझं कर्तव्य होते. आज कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. भाजपानं मोठे मन दाखवून पोटनिवडणूक टाळायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. कोल्हापूर पुरोगामी विचारांचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिले. महालक्ष्मीची कृपा असल्याने महिला आमदार कोल्हापूरातून निवडून आली आहे. कोल्हापूरच्या जनतेला हा विजय समर्पित आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.
संजय राऊत काय म्हणाले?
कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भोंगे, हनुमान चालीसा असं राजकारण सुरू केले. मात्र कोल्हापूरच्या जनतेने विरोधकांचे भोंगे खाली उतरवला आहे. समाजात तणाव निर्माण करण्याचं काम कोल्हापूरच्या जनतेने नाकारलं आहे. कोल्हापूरच्या उत्तर जनतेने महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करून दाखवलं आहे. भोंग्याचे राजकारण आजच संपलं आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.