कोल्हापूर 'उत्तर'चा निकाल: एक फंडा दोन पराभव, अठरा वर्षानंतर पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:50 PM2022-04-19T12:50:07+5:302022-04-19T13:04:07+5:30

विरोधातील उमेदवाराला शेवटच्या दोन दिवसांतील जोडण्या करण्यात अडचणी निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा फंडा अठरा वर्षांनंतर या निवडणुकीत पुन्हा यशस्वी झाला.

Kolhapur North results: Fund to win the election by creating difficulties for the opposition candidate in the last two days | कोल्हापूर 'उत्तर'चा निकाल: एक फंडा दोन पराभव, अठरा वर्षानंतर पुनरावृत्ती

कोल्हापूर 'उत्तर'चा निकाल: एक फंडा दोन पराभव, अठरा वर्षानंतर पुनरावृत्ती

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : विरोधातील उमेदवाराला शेवटच्या दोन दिवसांतील जोडण्या करण्यात अडचणी निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा फंडा अठरा वर्षांनंतर या निवडणुकीत पुन्हा यशस्वी झाला. या फंड्याने लोकसभेला धनंजय महाडिक आणि आता सत्यजित कदम यांचा पराभव केला आहे.

घटना - ०१ : ती लोकसभेची २००४ ची निवडणूक. धनंजय महाडिक शिवसेनेकडून रिंगणात होते. त्यांचे राजकारण आणि महाडिक गटही तावात होता. तरुण उमेदवार आणि शिवसेनेचा भगवा यामुळे महाडिक यांची प्रचंड हवा होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते सदाशिवराव मंडलिक रिंगणात होते. विक्रमसिंह घाटगे हे महाडिक यांच्या बाजूने मैदानात होते. कागलचा राजकीय संघर्षही या निवडणुकीत उतरला होता. शेवटच्या दोन दिवसांत सीट गेली, मुख्यतः कोल्हापूर धुऊन गेले, अशी हवा झाली. मंडलिक यांचे  विश्वासू आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे कागलची जबाबदारी होती. त्यांनी कागल सोडले आणि कोल्हापूरची सूत्रे हातात घेतली.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. गृहमंत्री आर.आर. पाटील होते. त्यांनी आदेश सोडले आणि महाडिक यांच्या पेट्रोल पंपावर भेसळयुक्त इंधन पुरवठा म्हणून धाडी पडल्या. पोलिसांनी तपासणीच्या नावाखाली पंपावर आणि घरावर बंदोबस्त लावला. धाडी पडल्याच्या बातम्यांनी बदनामी होऊन हवा पालटली. महाडिक यांना शेवटच्या जोडण्या लावण्यात अडचणी आल्या आणि राष्ट्रवादीने मात्र पोती सैल केली. त्याचा परिणाम निकालावर झाला. महाडिक यांचा १४ हजारांच्या निसटत्या मतांनी पराभव झाला. मुश्रीफ या विजयाचे शिल्पकार ठरले. महाडिक यांच्या पंपावरील छाप्याचे पुढे काय झाले हे आजपर्यंत कोल्हापूरला समजले नाही.

घटना - ०२ : कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक. काँगेसच्या जयश्री जाधव विरुद्ध भाजपचे सत्यजित कदम यांच्यात लढत. प्रचार अखेरच्या टप्प्यात. मतदान १२ एप्रिलला आणि आदल्या दिवशी भाजपचे पाच-सहा कार्यकर्ते पैसे वाटताना नागरिकांनी पकडून दिले. पैसे वाटताना भाजपचे कार्यकर्ते सापडल्याच्या बातम्या जोरदार व्हायरल झाल्या. पोलिसांत गुन्हे दाखल झाले. त्यातून नकारात्मक वातावरण तयार झाले. शेवटच्या दिवसांतील जोडण्या लावण्यावर मर्यादा आल्या. आता निवडणूक झाली, निकाल लागला; पण पैसे वाटप तक्रारीचे पुढे काय झाले, हे कधीच समजत नाही. सरकार ‘हातात’ असले की विरोधकांची अशी जिरवता येते त्याचा अनुभव पुन्हा या निवडणुकीत आला.

Web Title: Kolhapur North results: Fund to win the election by creating difficulties for the opposition candidate in the last two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.