कोल्हापूर : हक्क मिळविण्यासाठी विभाजन नको, एकजूट आवश्यक : मनीषा गुप्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:10 PM2018-11-15T16:10:08+5:302018-11-15T16:16:58+5:30
जाती, धर्म, पंथ आदींच्या पातळीवर महिला एकमेकांपासून दुरावत आहेत. त्यांचे अशा पद्धतीने होणारे विभाजन क्लेशदायी आहे. त्यामुळे आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक हक्क मिळविण्यासाठी आपल्या विभाजन नको, तर एकजूट राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, विचारवंत मनीषा गुप्ते यांनी गुरूवारी येथे केले.
कोल्हापूर : जाती, धर्म, पंथ आदींच्या पातळीवर महिला एकमेकांपासून दुरावत आहेत. त्यांचे अशा पद्धतीने होणारे विभाजन क्लेशदायी आहे. त्यामुळे आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक हक्क मिळविण्यासाठी आपल्या विभाजन नको, तर एकजूट राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, विचारवंत मनीषा गुप्ते यांनी गुरूवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील सातव्या महाराष्ट्र राज्य महिलाआरोग्य हक्क परिषदेच्या उदघाटनप्रसंगी त्यांचे बीजभाषण झाले. विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीतर्फे आयोजित परिषदेचा विषय ‘महाराष्ट्र : सामाजिक, राजकीय वर्तमान आणि महिलांचे आरोग्य’ असा आहे. वि. स. खांडेकर सभागृहातील या कार्यक्रमास संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या (संग्राम) जनरल सेक्रेटरी मीना शेषू, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, अध्यासनाच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पाटील प्रमुख उपस्थित होत्या.
ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या मनीषा गुप्ते म्हणाल्या, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी कष्टकरी महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी सजग राहिले पाहिजे. आरोग्य हा मूलभूत अधिकार नसल्याने त्याचे खासगीकरण सहजतेने होत असून त्याचा परिणाम गरीब, महिला, अल्पसंख्यांकांवर होत आहे.
सरकारी आरोग्य सेवा सदृढ कशी होईल, याकडे आपण लक्ष द्यावे. देशात आज राज्यघटनेने दिलेले हक्क निघून जात आहेत. घरातील आणि बाहेरील कृत्रिम विभाजन दूर करणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी म्हणाल्या, महिलांचे विविध हक्क कायम राहण्यासाठी संविधान अबाधित राहणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमास तनुजा शिपूरकर, सीमा पाटील, अनुराधा गायकवाड, शुभांगी कुलकर्णी, सुजाता मुस्कान, अनुराधा भोसले, पद्मिनी पिळणकर आदींसह राज्यभरातील सुमारे पाचशे महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. प्रा. भारती पाटील यांनी परिषद आणि अध्यासनाची उद्दिष्टे सांगितली.
परिषदेच्या संयोजिका डॉ. मेघा पानसरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. लता भिसे यांनी प्रास्ताविक केले. विजया जोरी यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, उदघाटनानंतरच्या सत्रांमध्ये ऊसतोडणी, घरगुती, बांधकाम, कचरावेचक, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न, त्यांचे आरोग्याधिकार, शासकीय आरोग्य सेवा, योजनांबाबत चर्चा झाली.
अन्यथा सन्माचा अधिकार हिसकावून घेऊ : मीना शेषू
समाजाला बदलण्याची ताकद आमच्यात आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना पायउतार करण्याचे काम आपण करूया, असे आवाहन ‘संग्राम’ संस्थेच्या जनरल सेक्रेटरी मीना शेषू यांनी केले. त्या म्हणाल्या, महिलांचे हक्क आणि मानवाधिकारासाठी आपण काम करूया. देश सर्वांचा असून येथील भूमीवर जगण्याचा सन्मानाचा अधिकार प्रत्येकाला आहे. जर, हा अधिकार आम्हाला दिला नाही, तर आम्ही तो हिसकावून घेऊ.