कोल्हापूर : उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात नाही, शिक्षकांच्या बहिष्काराचा परिणाम; बारावी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 07:44 PM2018-02-26T19:44:23+5:302018-02-26T19:44:23+5:30
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम म्हणजे बारावीचे पाचहून अधिक पेपर झाले, तरी अद्यापही उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज सुरू झालेले नाही.
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम म्हणजे बारावीचे पाचहून अधिक पेपर झाले, तरी अद्यापही उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज सुरू झालेले नाही.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय शासनाने घेतला आहे; पण, गेल्या तीन वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे.
याअंतर्गतच बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात जाहीर केला. याबाबतची नोटीस देखील कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाला दिली आहे.
यानंतर राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीने कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या प्रवेशद्वारात प्रतिकात्मक उत्तरपत्रिकांची होळी करुन मूल्यमापनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बहिष्काराचा निर्णय जाहीर करुन पाच दिवस उलटले, तरी अद्यापही याबाबत शासनाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही.
या आंदोलनामुळे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामकाजाची सुरुवात झालेली नाही. दरम्यान, याबाबत शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिव पुष्पलता पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बारावीचे पाचहून अधिक पेपर आतापर्यंत झाले आहेत. उत्तरपत्रिकांचे मूल्यमापनची प्रक्रिया सुरू झालेली नाही. याबाबत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सुचनांनुसार कार्यवाही केली जाईल.
शासनाने लवकर निर्णय घ्यावा
उत्तरपत्रिका मूल्यमापनावरील बहिष्कार आंदोलनाला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही शासनाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. या आंदोलनामुळे कोल्हापूर विभागातील बारावीच्या सुमारे साडेतीन लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून असल्याचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, शासनाने आमच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास मुदतीत उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण केली जाईल.
बेमुदत धरणे आंदोलन मंगळवारपासून
कृती समितीच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे बारावी आणि दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर आम्ही बहिष्कार टाकला असल्याचे राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बी. एस. बरगे यांनी सांगितले. ते म्हणाले, समितीतर्फे मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. त्यासह मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबईतील आझाद मैदानावरील धरणे आंदोलन सुरुच राहणार आहे.
कृती समितीच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे समितीने गुरुवारी प्रतीकात्मक उत्तरपत्रिकांची होळी करून आंदोलनाची सुरुवात केली आहे. बारावी आणि दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. आमच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांसमोर आणि मुंबईतील आझाद मैदानात दि. २७ फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल.
- बी. एस. बरगे, जिल्हाध्यक्ष,
राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समिती