कोल्हापुरातील कुख्यात आरसी गँग तिसऱ्यांदा हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 11:34 AM2023-04-22T11:34:57+5:302023-04-22T11:35:30+5:30

टोळीची दहशत वाढत असल्याने पोलिसांनी त्यांना हद्दपार केली

Kolhapur notorious RC gang deported for the third time | कोल्हापुरातील कुख्यात आरसी गँग तिसऱ्यांदा हद्दपार

कोल्हापुरातील कुख्यात आरसी गँग तिसऱ्यांदा हद्दपार

googlenewsNext

कोल्हापूर : येथील राजारामपुरीसह जरगनगर व उपनगरात सक्रिय असणाऱ्या आर.सी. गँग या गुन्हेगारी टोळीविरुद्ध पोलिसांनी तिसऱ्यांदा हद्दपारीची कारवाई केली. टोळी प्रमुखांसह दहा जणांना गुरुवारपासून सहा महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले. टोळीप्रमुख रवी सुरेश शिंदे, प्रकाश कुबेर कांबळे, संदीप मोतीराम गायकवाड, योगेश मानसिंग पाटील, जावेद इब्राहीम सय्यद, सागर सुरेश जाधव, प्रदीप रामचंद्र कदम, अक्षय ऊर्फ आकाश अशोक कदम, अजय ऊर्फ अजित सुनील माने, विकी अनिल माटुंगे अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, शहर व जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांसह संघटित गुन्हेगारीच्या उच्चाटनासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिस ठाणेनिहाय गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजारामपुरी पोलिस प्रशासनाने शहर, जिल्ह्यात कुख्यात, पोलिस रेकॉर्डवरील सराईत, हिंसात्मक कारवाईत गुंतलेला टोळी प्रमुख रवी सुरेश शिंदे व त्याच्या नेतृत्वाखालील ‘रवी शिंदे दादा प्रेमी आरसी गँगच्या’ दहा सदस्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला.

प्रस्तावानुसार चौकशी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आली. कागदपत्रे व स्वयंस्पष्ट अहवालासह जिल्हा पोलिस प्रमुखांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानंतर टोळीप्रमुखासह दहा जणांना हद्दपार करण्यात आले.

गंभीर गुन्हे

टोळीविरुद्ध प्राणघातक शस्त्रानिशी फौजदारीपात्र कट रचून विरोधी टोळीचे प्रमुखाचे खुनाचा प्रयत्न, गंभीर, साधी दुखापत, प्राणघातक शस्रानिशी सार्वजनिक ठिकाणी गैरकायद्याचे लोक जमवून खुनाचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्रानिशी दरोड्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल आहेत. याशिवाय काही गुन्हे टोळीच्या दहशतीमुळे पोलिसात दाखल झालेले नाहीत. टोळीची दहशत वाढत असल्याने पोलिसांनी त्यांना हद्दपार केली.
 

Web Title: Kolhapur notorious RC gang deported for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.