कोल्हापूर : खासगी सावकारांवर आता खाकीचा दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:23 PM2018-06-27T18:23:04+5:302018-06-27T18:23:04+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात खासगी सावकारकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. या सावकारांकडून गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या अवैध प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करून सावकारांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून निर्माण केलेले भय संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात खासगी सावकारकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. या सावकारांकडून गोरगरिबांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या अवैध प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करून सावकारांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून निर्माण केलेले भय संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे.
नागरिकांनी तक्रार देताच सावकारांवर गुन्हे दाखल करून त्यांना खाकीचा दंडुका पडेल. त्यासाठी कसलीही भीती न घेता नागरिकांनो तक्रार द्या, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले आहे.
खासगी सावकारांनी सर्वसामान्य लोकांना भरमसाठ व्याजाने पैसे देऊन बेकायदेशीर कागदपत्रे लिहून तसे बँकेचे धनादेश घेऊन बेकायदेशीर व्यवसाय कायदेशीर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
प्रत्येक महिन्यासाठी व्याजवसुली करून दिलेल्या रकमेच्या कितीतरी पटीने पैसे वसूल केल्यानंतर देखील गुंडांच्या माध्यमातून दहशत निर्माण करत आहेत. कर्जदारास वेठीस धरून ठार मारण्याची धमकी देऊन खंडणीच्या स्वरूपात रक्कम वसूल केली जात आहे.
ही रक्कम वसुलीसाठी सावकारांच्या गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. त्यांच्या या दहशतीमुळे अनेक लोक पोलिसांत तक्रार देण्यास भीतीपोटी येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार सावकारकीचा विशेष आढावा घेऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत.
जून महिन्यात नऊ गुन्हे दाखल केले आहेत. या सावकारकीच्या विळख्यात आणखी लोक अडकलेले आहेत. मात्र, पोलिसांत तक्रार देण्यास समोर येत नाहीत. अशा लोकांनी कोणतीही भीती न बाळगता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस अधीक्षक कार्यालय आदी ठिकाणी तक्रार द्यावी.
संबंधित तक्रारदारास पूर्णपणे पोलिसांचे संरक्षण राहील. निर्भयपणे आपल्या कुटुंबासोबत जगण्यासाठी सावकारकीच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर लुटीतून व त्रासातून मुक्त होण्यासाठी पोलिसांत येऊन गुन्हे नोंद करावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोहिते यांनी केले आहे.