कोल्हापूर : आता आॅनलाईन तक्रारीची सुविधा : अरुण देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:13 AM2018-05-19T11:13:36+5:302018-05-19T11:13:36+5:30
ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी येथे दिली. ग्राहकांची यापुढे कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या माध्यमातून येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर : ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्यांना आता थेट आॅनलाईन पद्धतीने ग्राहक मंचाकडे तक्रार करता येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथे प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली उपलब्ध असून महिन्याभरात सर्व जिल्ह्यांत ती लागू होणार आहे, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी येथे दिली.
ग्राहकांची यापुढे कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या माध्यमातून येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जि. प. महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, ग्राहक सल्लागार समिती पुणे विभाग किशोर लुल्ला आदी उपस्थित होते.
बैठकीत अरुण देशपांडे यांनी अन्न व औषध प्रशासन, वजन-मापे, कृषी, शिक्षण, आरोग्य, महावितरण आदी विभागांच्या ग्राहक तक्रारींबाबतचा सविस्तर आढावा घेतला.
देशपांडे म्हणाले, येत्या दिवाळीपर्यंत ग्राहक धोरण अंमलात आणले जाणार आहे. याबाबतची कार्यवाही राज्यस्तरावर सुरू आहे. ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळाव्यात त्याचबरोबर फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा याबाबत या ग्राहक धोरणांमध्ये विचार करण्यात आला आहे.
नंदकुमार काटकर यांनी जिल्ह्यात भेसळ होत असल्याचे निदर्शनास आलेल्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे, असे सांगितले.
यावेळी जिल्हा ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य जगन्नाथ जोशी, अनिल जाधव, पांडुरंग घाटगे, पुलाजी खैरे, दिलीपराव घाटगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
टोल फ्री क्रमांकावरील तक्रारीनंतर ७२ तासांत कारवाई
ग्राहकांची फसवणूक झाल्यास किंवा योग्य सेवा मिळाली नाही तर त्यांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार तत्काळ नोंदवावी. तक्रार नोंद केल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधितांवर कारवाई करून त्याचा अहवाल ग्राहकाला मिळतो. हा क्रमांक चोवीस तास सुरू आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.