कोल्हापूर : बेघरांसाठी आता चोवीस तास निवाऱ्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:59 AM2018-12-28T11:59:36+5:302018-12-28T12:01:37+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत कोल्हापूर शहरात आढळून येणाऱ्या बेघर ...
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत कोल्हापूर शहरात आढळून येणाऱ्या बेघर व निराश्रित लोकांना आत २४ तास निवाऱ्यांची सोय उपलब्ध झाली आहे.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील जेमस्टोन बिल्डिंग, लक्ष्मीपुरीतील व्यापारी संकुल, शिरोली जकात नाका व शाहू नाका या ठिकाणी १४१ बेड असलेले निवारे महापालिकेने उपलब्ध केले आहेत. स्त्री, पुरुष, दिव्यांग व आजारी लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
या निवाऱ्यांमध्ये वयस्कर, आजारी व लहान मुलांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा मोफत दिले जाते. इतर कमवत्या व्यक्तींकडून नाममात्र शुल्क घेतले जाते. तसेच या ठिकाणी आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, रोजगार, गरम पाणी यांची सोय असून शासकीय उपक्रमात लाभ घेण्यासाठी साहाय्य केले जाणार आहे. सध्या प्रतिदिन ३० ते ४० लोक याचा लाभ घेत आहेत.
या निवाऱ्यांचे देखभाल व व्यवस्थापन करण्यासाठी ‘एकटी’ संस्थेची निवड करण्यात आली आहे. निवाऱ्याच्या ठिकाणी व्यवस्थापक व काळजीवाहक यांची या संस्थेमार्फत निवड होऊन काम पाहिले जाते. संस्था व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत बेघरांचे रात्री सर्वेक्षण करून अशा लोकांना निवाऱ्यांमध्ये दाखल केले जाते. तिथे त्यांच्या स्वच्छता, आरोग्य या बाबींकडे लक्ष देऊन, त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जातो. निवारा सुरू झाल्यापासून आजतागायत १५९ महिलांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
शहरात कोठेही बेघर व निराश्रित व्यक्ती आढळल्यास ‘एकटी’ संस्थेशी संपर्क साधावा; तसेच इच्छुकांनी अन्नदान करण्याचे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
ज्यांना अन्नदान करायचे आहे त्यांनी या फोन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
दूरध्वनी क्रमांक- एकटी संस्था- ०२३१-२६६१४४०, ९५०३०६७१०० , ९९२२२०१७७३, ९८८१३२०९४६, ९७६५४५३५३५.