कोल्हापूर : ‘न्यूट्रीयंटस’ची याचिका फेटाळली, ‘दौलत’च्या कार्यवाहीचा जिल्हा बॅँकेचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 02:26 PM2018-12-25T14:26:03+5:302018-12-25T14:27:45+5:30
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याबाबत ‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने दाखल केलेली याचिका अखेर जिल्हा न्यायालयाने फेटाळली. जिल्हा बॅँकेने कारखान्याचा ताबा घेतला आहेच, पण पुढील कार्यवाही करण्यासाठी या निकालाने मार्ग मोकळा झाला आहे.
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याबाबत ‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने दाखल केलेली याचिका अखेर जिल्हा न्यायालयाने फेटाळली. जिल्हा बॅँकेने कारखान्याचा ताबा घेतला आहेच, पण पुढील कार्यवाही करण्यासाठी या निकालाने मार्ग मोकळा झाला आहे.
‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने कराराचा भंग केल्याने जिल्हा बॅँकेने कारखाना भाडेतत्त्वाचा करार रद्द ठरविला. बॅँकेने कारखाना ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर ‘न्यूट्रीयंटस’ने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले. लवादाच्या माध्यमातूनच कारखान्याचा ताबा घेता येत नसल्याचे कंपनीने न्यायालयात म्हणणे मांडले; पण मुळात कराराचा भंग केल्याने कायद्यानेच कारखान्याचा ताबा बॅँकेकडे येतो, असा युक्तिवाद जिल्हा बॅँकेच्या वतीने करण्यात आला.
कंपनीने चार कोटी दोन दिवसांत भरण्याचे लेखी आश्वासन न्यायालयात दिले होते, त्या कालावधीतही त्यांनी पैसे भरले नसल्याने बॅँकेने कारखान्याचा ताबा घेतला. न्यायालयाने यावर सोमवारी निकाल राखीव ठेवला होता, त्यानुसार तो फेटाळण्यात आला.
‘दौलत’चा ताबा बॅँकेकडेच आहे, पण न्यायालयाच्या निकालाने कायदेशीर आधार मिळाला आहे. त्यामुळे पुढील विक्री अथवा भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या प्रक्रियेस वेग येणार आहे. गेले दोन हंगाम कारखान्याचे गळीत बंद आहे. शेतकरी व कर्मचाऱ्यांचा थकीत प्रश्न आहे. त्यालाही गती मिळण्याची शक्यता आहे.
लवकरच भाडेतत्त्वाची निविदा
‘न्यूट्रीयंटस’ची याचिका फेटाळल्याने बॅँकेने ‘दौलत’ भाडे तत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. आर्थिक वर्ष जवळ आल्याने निर्णय लवकर घेतला नाही तर तेवढी एनपीए तरतूद करावी लागणार असल्याने लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे.
‘दौलत’बाबत ‘न्यूट्रीयंटस’ कंपनीने दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे पुढील प्रक्रियेचा जिल्हा बॅँकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
- अॅड. लुईस शहा,
वकील, जिल्हा बॅँक