कोल्हापूर : कोषागार कर्मचाऱ्यांच्या सामुहिक रजेमुळे कार्यालय ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:22 PM2018-05-04T14:22:14+5:302018-05-04T14:22:14+5:30
कोषागार कर्मचाऱ्यांच्या (गट-क) विविध प्रलंबित मागण्यांकरिता गेले दोन दिवस सुरु असलेल्या सामुहिक रजा आंदोलनामुळे सोमवार पेठेतील जिल्हा कोषागार कार्यालय शुक्रवारी ओस पडले होते. या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास सहा जूनपासून कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला.
कोल्हापूर : कोषागार कर्मचाऱ्यांच्या (गट-क) विविध प्रलंबित मागण्यांकरिता गेले दोन दिवस सुरु असलेल्या सामुहिक रजा आंदोलनामुळे सोमवार पेठेतील जिल्हा कोषागार कार्यालय शुक्रवारी ओस पडले होते. या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास सहा जूनपासून कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात एकूण ६८ कर्मचारी सहभागी झाले होते. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे यांना दिले.यावेळी कर्मचाऱ्यांनी कार्यालय आवारात निदर्शने केली.कर्मचारी कार्यालयात नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागत होते.
कोषागारातील लेखा लिपिक यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, गट क ची ३२ टक्के पदे रिक्त आहेत, त्या जागा भराव्यात, २००८ नंतर पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सामावुन घ्यावे. कोषागारातील ७०० वरिष्ठ लेखापाल पदासाठी २० टक्के म्हणजेच १४० पदे सहाय्यक लेखा अधिकारी यांना पदोन्नती मिळाव्यात आदी मागण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा कोषागार कार्यालयाच्या आवारात गट-क च्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
निदर्शनात जिल्हा शाखेचे अध्यक्ष संतोष साळोखे, सरचिटणीस धीरज सणगर, सुदर्शन कुंभार, दीपक शिंदे, भारत पाटोळे, दिनकर टिपुगडे, सचिन कुंभार, गजानन शिंदे, दीपक कांबळे, अजित कांबळे, जयदीप कुंभार, प्रमोद कलकुटकी आदींचा सहभाग होता.