कोल्हापूर : विस्कळीत पाणी पुरवठ्याबद्दल अधिकाऱ्यांना झापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:32 AM2018-08-11T11:32:29+5:302018-08-11T11:35:44+5:30
कोल्हापूर शहरात वारंवार विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याबद्दल शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना झापले. ‘काय करायचे ते एकदाच करा; पण नागरिकांना व्यवस्थित पाणी पाजा,’ अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.
कोल्हापूर : शहरात वारंवार विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याबद्दल शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना झापले. ‘काय करायचे ते एकदाच करा; पण नागरिकांना व्यवस्थित पाणी पाजा,’ अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.
गेल्या काही महिन्यांपासून शहरात वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नियोजनाचा अभाव आहे. त्याचा फटका शहरवासीयांना बसत आहे, अशा भावना व्यक्त करीत अफजल पीरजादे यांनी जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना सभेत झापले. त्यावेळी कुलकर्णी यांनी जलवाहिन्या जुन्या व खराब आहेत. त्यांना गळती लागली की पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘काय करायचे ते एकदाच करा, वारंवार असे प्रकार घडतात, ते थांबले पाहिजेत,’ असे अफजल पीरजादे यांनी सांगितले.
सिद्धार्थनगर व परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नियमित पाणीपुरवठा केव्हा होणार आहे? प्रत्येक वेळी वीजपुरवठ्याचे कारण सांगितले जाते. त्याबद्दल कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असेही पीरजादे यांनी बजावले. बालिंगा येथील ट्रान्स्फॉर्मर जळाला होता, तो दुरुस्त करून घेण्यात आला असल्याने यापुढे पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
सभेत आरोग्य विभागाच्या कारभारावरही ताशेरे ओढले गेले. आरोग्य विभागात कर्मचारी कमी असल्याने प्रभागात कचरा उठाव सुरळीत होत नसल्याची तक्रार प्रतिज्ञा निल्ले यांनी केली. कर्मचाऱ्यांची विभागणीही चुकीची असून एका प्रभागात ४०, तर दुसऱ्या प्रभागात १० असे कर्मचारी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे समान वाटप करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. कपिलतीर्थ मार्केटमधील पार्किंगच्या जागेत कोंड्याळ्यातील कचरा इतरत्र पसरलेला असतो, त्याचा नागरिकांना त्रास होतो, याकडे दीपा मगदूम यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
निकम पार्क क ंपौंडची आवश्यक ती जागा सात दिवसांची नोटिसीची मुदत संपल्यानंतर ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना मगदूम यांनी अधिकाऱ्यांना दिली. शहरात मोठ्या प्रमाणात हातगाड्या रस्त्यावर लागत आहेत. रस्त्यांवर, पदपथावर अतिक्रमण वाढत आहे. तातडीने या अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणी संजय मोहिते यांनी केली.