कोल्हापूर : ओम नम: शिवायचा जप, तिसऱ्या श्रावण सोमवारी महादेव मंदिरात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:28 PM2018-08-27T16:28:01+5:302018-08-27T17:24:57+5:30
महाअभिषेक, सत्यनारायण पूजा, तीर्थप्रसाद वाटप, शिवलिलामृत वाचन, ओम नम: शिवायचा जाप, भजन, किर्तन अशा विविध धार्मिक उपक्रमांनी तिसरा श्रावण सोमवार पार पडला. यानिमित्त शहरातील विविध महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती.
कोल्हापूर : महाअभिषेक, सत्यनारायण पूजा, तीर्थप्रसाद वाटप, शिवलिलामृत वाचन, ओम नम: शिवायचा जप, भजन, किर्तन अशा विविध धार्मिक उपक्रमांनी तिसरा श्रावण सोमवार पार पडला. यानिमित्त शहरातील विविध महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती.
श्रावण महिन्यात भगवान शंकराची उपासना केली जाते. त्यात तिसरा श्रावण सोमवारला विशेष महत्व आहे. इतर सोमवारी व्रतस्थ राहणे नाही जमले तर अनेक लोक तिसरा श्रावण सोमवार करतात.
यानिमित्त कैलासगडची स्वारी मंदिरात पहाटे धार्मिक विधीने शिवास अभिषेक करण्यात आला. दुपारी सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसादाचे वाटप झाले. सायंकाळी विठ्ठलपंथी महिला भजनी मंडळाने भजन सादर केले. त्यानंतर श्रीमान योगी या छत्रपती शिवरायांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन झाले.
नागाळा पार्क येथील श्री बालकृष्णजी की हवेली येथे सायंकराळी हिंडोळा विजय दर्शन, आरती, सेवा असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. याशिवाय अंबाबाई मंदिरातील मातृलिंग, अतिबलेश्वर, वटेश्वर, पंचगंगा नदी घाटावरील महादेव मंदिरे, कोल्हापुरातील सर्वात मोठे शिवलिंग असलेले उत्तरेश्वर मंदिर, ऋणमुक्तेश्वर अशा विविध महादेव मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होती.
तर मंदिराबाहेर फळ, फूल, बेल, केळी अशा पूजेच्या साहित्यांची दुकाने थाटली होती. काही मंदिरांमध्ये भाविकांना केळ, राजगिरा लाडू, खिचडी या फराळाचे वाटप केले जात होते.
कुमारिका पूजन, देवतांना नैवेद्य
श्रावण महिन्यात घरोघरी कुमारिकांचे पूजन केले जाते. लहान मुलींना घरी बोलावून त्यांना हळदी-कुंकू, पान-सुपारी देवून सुग्रास जेवण वाढले जाते. त्यामुळे गल्लोगल्लीतल्या घराघरात हा कुमारिका पूजन सोहळा सुरू होता. सगळीकडूनच बोलावणे आल्याने या लहान मुलींची मात्र उत्साही लगबग सुरू होती. या महिन्यात शहरातील सर्व देव-देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची पद्धत आहे. त्यामुळे अनेक कुटूंबात पूरणपोळीचा बेत करण्यात आला होता.