कोल्हापूर : दीड लाखाचा मद्यसाठा जप्त, चालकास अटक : गगनबावडा मार्गावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:47 AM2018-12-18T11:47:21+5:302018-12-18T11:48:15+5:30
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर एम. टी. डी. सी. रिसोर्टच्या परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी छापा टाकून अवैध मद्याची वाहतूक करणारी कार पकडली. यावेळी चालक अक्षय अरविंद खटावकर (वय २४, रा. राजापूर, जि. रत्नागिरी) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून दीड लाखाचा मद्यसाठा व कार, असा मिळून साडेपाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर एम. टी. डी. सी. रिसोर्टच्या परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी छापा टाकून अवैध मद्याची वाहतूक करणारी कार पकडली. यावेळी चालक अक्षय अरविंद खटावकर (वय २४, रा. राजापूर, जि. रत्नागिरी) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून दीड लाखाचा मद्यसाठा व कार, असा मिळून साडेपाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अधिक माहिती अशी, नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक जिल्ह्यात होण्याची शक्यता असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांद्वारे जिल्ह्याच्या सीमारेषेवर गस्त घातली जात आहे. सोमवारी गगनबावडा मार्गावर गस्त घालताना कार (एम. एच. ०७ क्यू ५६२७) संशयितरीत्या मिळून आली. तिची झडती घेतली असता, त्यामध्ये दीड लाख किमतीचा मद्यसाठा मिळून आला.
चालक अक्षय खटावकर याच्या मुसक्या आवळून त्याच्याकडे चौकशी केली असता, गोव्याहून मद्यसाठा आणल्याचे त्याने सांगितले. हा मद्यसाठा तो राजापूरला घेऊन जात होता. तो कोणाला देणार होता, यासंबंधी चौकशी सुरू आहे. ही कारवाई निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, कॉन्स्टेबल सुहास वरुटे, जयसिंग खुटावळे, सुखदेव सिद, दिलीप दांगट, मोहन पाटील यांनी केली.